(खेड / प्रतिनिधी)
मुंबई-गोवा महामार्गावरील मोरवंडेनजीक बुधवारी सायंकाळी 4.15 वाजण्याच्या सुमारास विरारहून गुहागरला जाणारी एसटी बस पलटी झाली. या अपघातात 7 प्रवासी जखमी झाले. बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे समोर येत आहे. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली. याप्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत बसचालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
बसचालक आपल्या ताब्यातील विरार-गुहागर एसटी बसमधून प्रवाशांना घेवून गुहागराच्या दिशेने जात होता. मोरवंडेनजीक चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस अचानक उलटली. अपघातानंतर बस प्रवासी मदतीसाठी आक्रोश करू लागल्यानंतर ये-जा करणारी वाहने अपघातस्थळी थबकली. याबाबत स्थानिक पोलिसांना कळवल्यानंतर तातडीने घटनास्थळी पोहाचले. बसमधील जखमी प्रवाशांना लोटे येथील घरडा हॉस्पिटल व परशुराम हॉस्पिटल येथे उपारासाठी दाखल करण्यात आले. जखमींची नावे समजू शकली नाहीत.
अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकही काहीकाळ विस्कळीत झाली होती. काहीवेळ एकेरी वाहतुक अवलंब करण्यात आल्याने वाहनांच्या दोन्ही बाजूला रांगा लागल्या होत्या. या अपघातात सुदैवाने जिवीतहानी टळली असली तरी बस उलटल्याचे समजताच प्रवाशी भयभीत झाले होते. बस चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे अपघात घडल्याचे पुढे येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करत चालकावर गुन्हा दाखल केला आहे.