(खेड)
खेड तालुक्यातील तळे-सात्विनवाडी येथे एका गायीचा लम्पी आजाराने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तसेच अन्य 3 जनावरेही लम्पीच्या रोगाने आजारी असल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकाराने पशुसंवर्धन विभाग खडबडून जागा झाला आहे.
सविस्तर वृत्त असे की, तळे-सात्विनवाडी येथील कृष्णा भिकाजी मोरे यांच्या मालकीची गाय गेले काही दिवस लम्पी रोगाने आजारी होती. या गायीवर उपचार सुरू होते. मात्र शुकवारी या गायीचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती पशुधन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवल्यानंतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी करून गायीचा मृत्यू लम्पीच्या रोगाने झाल्याचे स्पष्ट केले. अन्य तीन जनावरेही आजारी असल्याने शेतकऱ्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
दोन महिन्यांपूर्वी मांडवे-डिकेवाडी येथील एका शेतकऱ्याच्या पाळीव जनावरांना लम्पी रोगाची लागण झाली होती. या प्रकारानंतर संशयित जनावरांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. तसेच पंचक्रोशीतील 64 जनावरांचे तातडीने लसीकरणही करण्यात आले होते. यानंतर लम्पी रोगाचा प्रादुर्भाव थांबलेला असतानाच तळे-सात्विनवाडी येथे या रोगाने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग धास्तावला आहे.