(खेड)
खेडमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवल्याने गाडीवरील नियंत्रण सुटल्याने 20 फुट खोल दरीत रिक्षा पलटी झाली. या अपघातात रिक्षातील प्रवाशांच्या किरकोळ, गंभीर दुखापतीस कारणीभूत ठरल्यापकरणी रिक्षा चालकावर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शशिकांत विष्णू मोरे (49, भरणे, खेड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शशिकांत मोरे हा आपल्या ताब्यातील रिक्षामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन भरणे ते मुरडे असा प्रवास करत होता. 9 मे रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास मुरडे शिंदेवाडी येथील चढाजवळ रिक्षा रिव्हर्सने पाठीमागे आल्याने उजव्या बाजूला 20 फुट खोल कॅनॉलमध्ये पडली. या अपघातात रिक्षा चालकासह प्रवाशांना किरकोळ व गंभीर दुखापती झाल्या.
या अपघातप्रकरणी रिक्षा चालक शशिकांत मोरे याच्यावर भादविकलम 304अ, 279, 337, 338, मोटर वाहन कायदा कलम 184, 66/192 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.