( खेड / भरत निकम )
महामार्गावरील रखडलेल्या कामामुळे रस्त्यावर उतरलेल्या मनसैनिकांनी आंदोलन सुरु केले असून महामार्गाचे काम करणाऱ्या कल्याण टोलचे तीन डंपर मनसैनिकांनी घोषणा देवून त्यांच्या काचा फोडल्या होत्या. या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतल्यानंतर चौकशी करत त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या स्थितीत आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर टीका करीत ठेकेदार आणि प्रशासनाचे वाभाडे काढण्यास सुरुवात केली होती. सरकार तर्फे उलट मनसैनिकांना डिवचण्याचा प्रयत्न भाजपचे नेते व सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केला. यानंतर महामार्गावरील ठेकेदाराच्या कार्यालयासह वाहनांची तोडफोड सुरु केली होती.
खेड हद्दीत असलेल्या टोल नाक्यावर पोलीसांनी तत्काळ पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. त्यामुळे इथल्या कार्यकर्त्यांना तोडफोडची संधी मिळाली नव्हती. मात्र रस्त्यावर उतरुन जोरदारपणे आंदोलन केले होते. त्यानंतर स्वतः पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोलाड येथे सभा घेऊन सरकारला सळो की पळो करुन सोडण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर खेड येथील संजय आखाडे आणि गणेश सुर्वे यांनी भोस्ते घाटाच्या माथ्यावर कल्याण टोल कंपनीने उभे ठेवलेले तीन डंपरच्या काचा फोडल्या आणि घोषणा दिल्या.
याची माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी दोन्ही जणांना ताब्यात घेतले व चौकशी करत न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांची जामिनावर मुक्तता केली आहे. जामिनावर सुटका झाल्यावर मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी त्यांची भेट घेतली होती. यावेळी अनेक मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते