(खेड / भरत निकम)
कुळवंडी व तिसंगी येथील हातभट्टीची दारु दिवसा ढवळ्या आणि रात्री अलिशान कारमधून केली जात असल्याची चर्चा आहे. अशा गैरधंद्यांवर कायदेशीर कारवाई करुन ते पूर्णपणे बंद करण्याची जबाबदारी उत्पादन शुल्क खात्यासह पोलीसांची असतानाही या धंद्यांना पाठबळ कुणाचे मिळत आहे का, असा सवाल येथील कारवाई थंड पडल्याने जनता विचारत आहे.
तिसंगी, कुळवंंडी बरोबर आता जैतापूर या गावी गावठी हातभट्टीची दारुची इंडस्ट्रीज उभारलेली आहे. दारु गाळण्यासाठी वेल्डरकडून विशिष्ट प्रकारच्या टाक्या बनवून घेतल्या जात आहेत. या गावातून दशकानुदशके दारुचे धंदे चालत आहेत. गेल्या अनेक दशकांपासून पोलीस व दारुबंदी खाते आलटून पालटून कारवाई करतात. त्यानंतर हे धंदे पुन्हा पुर्ववत होतात. हा ऊन-पावसासारखा खेळ येथे गेल्या अनेक वर्षांपासून सुरुच आहे. मात्र ठोस कारवाई करुन उपाय योजना आखल्या जात नाहीत. त्यामुळे हे धंदे बंद होतच नसल्याची माहिती आहे.
पोलीस ठाण्यात किंवा दारुबंदी खात्यात नव्याने दाखल झालेले अधिकारी सुरुवातीला कारवाईचा दांडूका उगारतात. मात्र त्यानंतर ही कारवाई अगदी थंड पडते. हा गेल्या अनेक वर्षापासूनचा अनुभव येथील नागरिकांना येत आहे. तसेच एका खात्याने कारवाई केली तर दुसऱ्या खात्याकडून दारुधंदेवाल्यांचे सांत्वन केले जात असल्याचा प्रकार घडत असल्याचे स्थानिकांमधून बोलले जाते. या प्रकारामुळे दारु धंदे आजही सुरुच आहेत. प्रत्येक वेळी दारुधंदेवाले नवी ट्रिक वापरत असतात. यामध्ये नव्या अलिशान कारमधून दारुची वाहतूक करुन तिची विक्री संपूर्ण उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील गावोगावी जाऊन सुरु असते.
गावात सर्वसामान्य माणसाला दुचाकी चालवायची झाली तर वाहतूक पोलीस गाडीची कागदपत्रे आणि परवाना रस्तोरस्ती तपासतात. मग दारुची वाहतूक करताना एकही दारुधंदेवाला सापडलेला ऐकण्यात येत नाही, हे दुर्दैव स्थानिक नागरिक यांचेच मानले गेले पाहिजे. दारुचे गाळप झाल्यानंतर तिची वाहतूक गावागावात बिनधास्तपणे केली जाते, यावर अंकुश कुणाचा असतो? हे अद्यापही उमगलेले नाही. विनापरवाना दारु गाळून त्याची वाहतूक करुन बिनदिक्कतपणे विक्री होत असते. यासाठी आशिर्वाद आणि पाठबळ कुणाचे आहेत का ? असे असेल तर या बिनबोभाटपणे चाललेल्या गावठी हातभट्टीच्या दारुधंद्यांना जिल्हाधिकारी यांनी परवानगीच द्यावी, अशी मागणी या विभागातील जनतेतून करण्यात येत आहे.