( खेड )
भरणे – जाधववाडी येथे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ८३ गावठी बॉम्बचा साठा केल्याप्रकरणी अटक केलेल्या अल्पेश प्रकाश जाधव यास न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता आज २९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
खाडीपट्ट्यातील बहिरवली मार्गावर मुंबई – पन्हाळजे एस.टी. बसखाली डुक्कर मारण्यासाठी पेरण्यात येणारा बॉम्ब फुटल्याने टायर फुटल्याची घटना घडल्यानंतर पोलिसांनी खोलवर जाऊन तपास केला होता. भरणे येथील एका घरात गावठी बॉम्बचा साठा असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक सुजित गडदे यांच्या पथकाने छापा मारला असता ८३ गावठी बॉम्ब सापडले. हे गावठी बॉम्ब नेमके कुठून आणले की बनवले, यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, या साऱ्या शक्यतांचा पडताळा पोलिसांकडून करण्यात येत आहे.