( खेड )
मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र तीव्र उतार व यू आकाराचे वळण असल्याने माल वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना हे वळण अक्षरशः डोकेदुखी ठरत आहे. चौपदरीकरणा दरम्यान घाटाच्या बाजूला केलेल्या डोंगर कटाईमुळे गेल्यावर्षी पाचवेळा भूस्खलन होऊन महामार्गाची एक बाजू पूर्णपणे ठप्प झाली होती. या घाटात ट्रक टर्मिनल तयार करण्याचे कामही सुरू आहे.
नावाप्रमाणेच हा भोस्ते घाट नागमोडी वळणाचा आहे. तीव्र उतार आणि या वळणानी वाहतुकीसाठी त्रासदायक ठरत आहे. गोव्यातून मुंबईच्या दिशेने घाट उतरताना अवजड वाहनांचे या वळणावर अनेकदा अपघात झाले आहेत. मात्र अद्यापपर्यंत या यू आकाराच्या वळणावर अद्याप कायमस्वरुपी उपाययोजना करण्यात आलेली नाही.