(खेड/इक्बाल जमादार)
खेड तालुक्यातील भरणानाका येथील काळकाई मंदिराच्या परिसरातील जोगवा मागणारी महिला आपल्या मुले व पतीसह झोपलेली असताना अज्ञाताने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तिने आरडाओरड करून पतीला झोपेतून उठवले. यावेळी पती हा पत्नीला सोडवायला गेला असता राग मनात धरून अज्ञाताने आपल्या जवळील लाकडाच्या दणक्याने डोक्यात वार करून पती सुरेश काळे याला गंभीर दुखापत केली. उपचार दरम्यान त्याचा शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथे मृत्यू झाला. ही घटना दि 21 मे 2022 रोजी मध्यरात्री 02 वाजण्याच्या सुमारास घडली होती. विनयभंग गुन्ह्याबरोबरच खुनाचा गुन्हा येथील पोलीसात दाखल करण्यात आला होता.
या खुनातील आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी अथक प्रयत्न केले. खुन्याला पकडण्यासाठी पथक तयार करण्यात आली. या गुन्ह्याच्या तपास कामी जिल्हा पोलीस अधीक्षक मोहीतकुमार गर्ग यांच्या आदेशानुसार डिवायएसपी शशिकिरण काशिद, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शहा, पोलीस निरीक्षक निशा जाधव, सपोनि श्री.सुजित गडदे आणि त्याचे सहकाऱ्यानी कसब, कौशल्य पणाला लावून आरोपीला पकडण्यात यश आले. दिनेश दत्ताराम चाळके (41 रा. सुकिवली ता खेड जि रत्नागिरी) असे त्याचे नाव आहे. त्याने खुनाची कबुली दिली आहे.