(खेड / प्रतिनिधी)
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील घरडा केमिकल कंपनीकडून अॅग्रो केमिकलची उत्पादने घेत तब्बल 92 लाखांची फसवणूक करणाऱ्या तरुणाला इंदोर येथून ताब्यात घेण्यात आले आहे. अशोक जैस्वाल (खांडवा-मध्यप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. न्यायालयाने त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक जैस्वाल हा अशोक ट्रेडर्स या फर्मद्वारे घरडा कंपनीची कृषी उत्पादने पुरवण्याचे काम करत होता. गेले अनेक वर्षे काम करणाऱ्या अशोक जैस्वाल वर कंपनीचाही विश्वास होता. मात्र 2018 पासून त्याने सातत्याने उत्पादनाची रक्कम थकवण्याचे प्रकार सुरू झाले. एवढच नव्हे तर तब्बल 92 लाख रूपये थकवल्यानंतर कंपनीने त्याच्यामागे वसुलीचा तगादा लावला. मात्र तरीही तो चालढकल करत होता.
अखेर कंपनीने पोलीस व जिल्हा न्यायालयात दाद मागितली. एप्रिल 2022 मध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला. मात्र पोलिसांना तो सतत गुंगारा देत होता. पोलीस उपविभागीय अधिकारी सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हर्षद हिंगे, हेड कॉन्स्टेबल विशाल धाडवे, सुनील पाडळकर यांचे पथक काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशमध्ये गेले होते. तो इंदोर रेल्वेस्थानकानजीक असल्याचा पोलिसाना सुगावा लागला होता. या ठिकाणी जाऊन पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली.