(खेड / भरत निकम)
नवसाला पावणारी आणि भक्तांच्या हाकेला धावणारी अशी ख्याती असलेल्या मुंबई गोवा महामार्गावरील भरणे येथील खेडची ग्रामदैवत काळकाई देवीला प्रथमच शासकीय मानवंदना खेड पोलिसांकडून देण्यात आली.
काळधर्म निवारण करणारी काळकाई देवी अशी भक्तांच्या मनात श्रद्धा असणाऱ्या आदिमाया काळकाई देवीला दसऱ्याच्या मुहूर्तावर पोलिसांकडून मानवंदना देण्याची प्रथा सुरु करण्यात आली. दसरा आणि शिमगोत्सवाला देवीला मानवंदना देण्यात येणार आहे. याबाबत मंदिर व्यवस्थापन समितीकडून शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येत होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी ४ वाजता मंदिराच्या आवारात खेड पोलीसांकडून मांवनदना देण्यात आली.
हा सोहळा पाहण्यासाठी खेड, दापोली, मंडणगड, मुंबई येथून आलेले अनेक भक्त मंदिरात गर्दी करून होते. मंदिर व्यवस्थापनाचे अध्यक्ष सचिन जाधव आणि सचिव सुजित शिंदे यांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत.