(मुंबई)
राज्यभरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली असतानाच राज्य शासनाचे कर्मचारी, अधिकारी तसेच निवृत्तिवेतन धारकांना उत्सव साजरा करताना अडचण येऊ नये म्हणून ऑगस्ट महिन्याचे सप्टेंबरमध्ये होणारे वेतन, निवृत्तिवेतन त्यांना गणेशोत्सवापूर्वी प्रदान करण्यात यावे, अशा आशयाचे परिपत्रक शासनाने बुधवारी काढले.
त्यानुसार, ऑगस्ट महिन्याचे वेतन आणि निवृत्तिवेतन २९ ऑगस्ट रोजी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. वेतन देयकाचे प्रदान वेळेत होण्यासाठी अधिकाऱ्यांनी वेतन देयके कोषागारात सादर करावीत, असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. यासंदर्भातील तरतुदी जिल्हा परिषद, मान्यताप्राप्त व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था, कृषी विद्यापीठे, अकृषी विद्यापीठे व त्यांच्या संलग्न अशासकीय महाविद्यालयांचे अधिकारी, कर्मचारी, तसेच निवृत्तिवेतनधारक, कृटुंब निवृत्तिवेतनधारक यांना देखील लागू आहेत.