(मुंबई)
मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक आज पार पडली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना आणि कंत्राटी ग्रामसेवकांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारने कंत्राटी ग्रामसेवकांच्या वेतनात तब्बल १० हजार रुपयांची वाढ करत त्यांचे वेतन १६ हजार रुपये केले आहे. कंत्राटी ग्रामसेवकांच्या वेतनामध्ये वाढ करण्याची अनेकदा मागणी होत होती. त्याचबरोबर पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने तत्काळ मदत करण्यात येणार असून यासाठी १५०० कोटीची मंजुरी देण्यात आली आहे.
मंत्रिमंडळाच्या नव्या निर्णयानुसार मागील वर्षी पावसाळ्यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता सुधारित दराने मदत मिळणार आहे. मागील पावसाळ्यात नुकसान झालेल्या अनेक शेतकऱ्यांचे प्रस्ताव प्रलंबित होते, या शेतकऱ्यांसाठी आता नवीन सुधारित दराने मदत मिळणार आहे, त्यासाठी १५०० कोटी रुपयांच्या निधीला तात्काळ मंजुरी देण्यात आली आहे.
मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वपूर्ण निर्णय
- पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने तत्काळ मदत केली जाणार, यासाठी १५०० कोटींच्या निधीला तात्काळ मान्यता.
- राज्यातील कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात तब्बल १० हजारांची वाढ करत मानधन केले १६हजार रुपये.
- अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्यात केंद्राप्रमाणे सुधारणा.
पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्ती रक्कमेत वाढ. - लातूर येथे पशुरोग निदान प्रयोगशाळा स्थापन करणार
- पुण्यात चार अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करणार
- अतिरिक्त न्यायालये व जलदगती न्यायालयांना दोन वर्षे मुदतवाढ
- मानसिक आजारमुक्त व्यक्तींकरता पुनर्वसन गृहे योजना
- स्वातंत्र्य सैनिकांना घरांसाठी जमीन देण्यासाठी कौटुंबिक मासिक उत्पन्न मर्यादा वाढविली
- चिमूर आणि शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करणार