(रत्नागिरी / प्रतिनिधी)
राजकीय वादातून सोमेश्वर येथे काही वर्षापूर्वी झालेल्या खुनाच्या वादातून प्राणघातक हल्ला प्रकरणातील संशयितांची न्यायालयाने बुधवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
अक्षय प्रकाश मयेकर, प्रथमेश सुभाष बिडू, सुरज प्रकाश मयेकर, निलेश अनंत मयेकर, आशिष अनंत मयेकर, स्मितेश बोरकर, सुरज नांदिवडेकर अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना १० जुलै २०२३ दुपारी अकराच्या सुमारास घडली होती. २००९ ला रवींद्र उर्फ रवी मयेकर या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली होती.
या हत्येचा वाद पुन्हा सोमेश्वर गावात उफाळून आला आहे. हत्येमध्ये शिक्षा झाल्याच्या रागातून ९ जुलै रोजी रविवारी रुपेश मयेकरसह तिघांनी हत्या झालेल्या रवी मयेकर यांच्या पुतण्याला मारहाण केली होती. त्याच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी दुपारी विरोधी गटातील संशयितांनी ५ जणांनी दीपक उर्फ बाब्या मयेकर याच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. त्यानंतर हे पाचजण फरार झाले होते. त्यांना मदत करणाऱ्या दोघांसह पोलिसांनी सात जणांना अटक केली होती. न्यायालयाने सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. बुधवारी त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते.