शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत आणि आमदार नितीन देशमुखांंसह इतर काही जणांवर अकोल्याच्या लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अकोला रेल्वे स्थानकावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांच्या विरोधात गद्दार-गद्दार अशी जोरदार घोषणाबाजी केली होती. या प्रकरणी खासदार विनायक राऊत आणि आमदार नितीन देशमुख यांच्यासह अन्य कार्यकर्त्यावर रात्री उशिरा अकोला जीआरपी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे, जमाव जमवणे, एकत्रित येऊन घोषणाबाजी करणे, अश्लील भाषेत बोलणे अशा कलमांतर्गत हे गुन्हे दाखल झाले आहेत. अकोला रेल्वे स्थानकावर काल शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी आणि ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत आमने-सामने आले होते. मंगळवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास ही घटना घडली होती.
विदर्भ एक्स्प्रेसने दोन्ही खासदार मुंबईकडे निघताना दोघेही अकोला रेल्वे स्थानकावर समोरासमोर आले होते. यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी भावना गवळींसमोर गद्दार-गद्दार अशी घोषणाबाजी केली. भावना गवळी डब्याच्या बाहेर आल्यानंतरही ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची प्रचंड घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीच्या वेळी आमदार नितीन देशमुखही रेल्वे स्थानकावर उपस्थित होते.
खासदार भावना गवळी यांनी याबाबत अकोला लोहमार्ग पोलिसांत यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खासदार विनायक राऊत आणि बाळापूर विधानसभा आमदार नितीन देशमुख यांनी चिथावणी दिल्यामुळे माझ्याविरुद्ध अकोला रेल्वे स्थानकावर घोषणाबाजी झाली, असा आरोप खासदार भावना गवळींनी तक्रारीत केला होता. अकोला रेल्वे स्थानकावर घडलेला हा प्रकार अत्यंत चुकीचा असल्याचे भावना गवळी यांनी म्हटले आहे.