( मुंबई )
शिवसेनेतील आमदार अपात्रतेसंबंधीच्या सुनावणीला सुरुवात झालेली असतानाच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते खा. प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीची केस शिंदे गटापेक्षा वेगळी असल्याचे सांगताना एकनाथ शिंदे यांच्या केसमध्ये अनेक अडचणी आहेत, अशा शब्दांत बॉम्बगोळा टाकला. त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता पसरली असून, शिंदे गटाला अडचणीत आणण्याची खेळी तर खेळली जात नाही ना, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
खा. प्रफुल्ल पटेल यांनी शिंदे गटापेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेसची केस पूर्ण वेगळी आहे, असे सांगितले. राष्ट्रवादीच्या केसचा शिंदेंच्या केसशी काडीमात्र संबंध नाही. नागालँडच्या राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारांचा अजित पवार यांना पाठिंबा आहे. तसे प्रतिज्ञापत्र त्यांनी ३० जून रोजी दिले होते.राष्ट्रवादी कॉंग्रेसने अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुढे जाण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी नागालँडच्या आमदारांनी या निर्णयाला पाठिंबा दिला आणि अजित पवार यांचे नेतृत्व मान्य केले, असे पटेल म्हणाले. दुसरी बाब म्हणजे आमच्या पक्षाची राष्ट्रीय मान्यता रद्द झाली आहे. ५३ पैकी ४३ आमदार आमच्यासोबत आहेत.
विधान परिषदेतील ९ पैकी ६ आमदार सोबत आहेत. नागालँडमधील सर्व आमदार सोबत आहेत. जेवढे प्रांताध्यक्ष आहेत ते केवळ नॉमिनेटड अध्यक्ष आहेत. माझ्या सहीने त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. पक्षात निवडणुका पार पडलेल्या नाहीत. जिल्हा, राज्य आणि देशपातळीवरील अध्यक्ष एकत्र मिळून पक्षाच्या अध्यक्षांची निवड करतात. आमच्यात निवडणुका झाल्या नाहीत, असेही पटेल यांनी सांगितले. यातून त्यांनी शिंदे गटापेक्षा राष्ट्रवादीची केस वेगळी असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. खा. प्रफुल्ल पटेल यांनी शिंदे गटासमोर अनंत अडचणी असल्याचे सांगून बॉम्बगोळा टाकल्याने यावर तर्कवितर्क सुरू झाले आहेत.