(मुंबई)
शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्या एसआयटी चौकशीची घोषणा विधान परिषदेच्या सभापती निलम गोऱ्हे यांनी गुरुवारी केली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे यांनी शेवाळे यांची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर गोऱ्हे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. खासदार शेवाळे यांनी एका महिलेवर बलात्कार केल्याची तक्रार दाखल झाली आहे. त्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचा मुद्दा आमदार कायंदे यांनी उपस्थित केला होता.
विधान परिषदेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर मनिषा कायंदे यांनी खासदार राहुल शेवाळे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपाचा मुद्दा उपस्थित केला. शेवाळे यांच्याविरोधात पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार केली आहे. पीडित तरुणीला मुंबईत यायचे आहे. मात्र, पोलिसांच्या दबावामुळे ती येऊ शकत नाही. या प्रकरणाची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दखल घेऊन चौकशी करावी. पीडित तरुणीच्या जीविताला धोका असल्याने शेवाळे यांची एसआयटी चौकशी करण्याची मागणी कायंदे यांनी केली आहे.