(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार तथा शिवसेना नेते विनायक राऊत यांनी बुधवारी १८ ऑक्टोबर रोजी मालगुंड येथे सदिच्छा भेट देऊन मालगुंड गावातील विविध ठिकाणच्या सार्वजनिक नवरात्र उत्सवांच्या ठिकाणी विराजमान झालेल्या दुर्गादेवींचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रत्नागिरी शिवसेना तालुकाप्रमुख प्रदीप तथा बंड्या साळवी, उपतालुकाप्रमुख प्रकाश जाधव, माजी उपजिल्हाप्रमुख राजेंद्र शिंदे, रत्नागिरी शहरप्रमुख प्रमोद शेरे, संजय पुनसकर, माजी पं.स. सदस्या साक्षी रावणंग, तालुका युवासेना समन्वयक साईनाथ जाधव, रोहित साळवी, मालगुंडच्या सरपंच श्वेता खेऊर, उपसरपंच संतोष चौगुले, माजी सरपंच दीपक दुर्गवळी आदींसह मालगुंडचे ( उबाठा)गटाचे सर्व ग्रा.पं. सदस्य व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या भेटीत विनायक राऊत यांनी सर्वप्रथम मालगुंड गावची ग्रामदेवता श्री चंडिका देवीचे दर्शन मंदिरात जाऊन घेतले. यावेळी त्यांनी चंडिका देवीला गाऱ्हाणे घालून आपल्या पक्षवाढीसाठी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे यश सर्व ठिकाणी कायमपणे अबाधित राखण्यासाठी उपस्थित शिवसैनिकांसमवेत प्रार्थना केली. त्यानंतर त्यांनी मालगुंड मराठवाडी येथील सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ, मालगुंड बाजारपेठ येथील चंडिका नवरात्रौत्सव मित्र मंडळ, मालगुंड भंडारवाडा स्वातंत्र्यचौक नवरात्र उत्सव मंडळ आदी ठिकाणच्या सार्वजनिक नवरात्र उत्सवातील दुर्गादेवींचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी खासदार तथा शिवसेना नेते विनायक राऊत यांनी दिलेल्या सदिच्छा भेटीबद्दल समाधान व्यक्त केले.