(खालगाव / ऋषिकेश धामणे)
जगात कोठे स्वर्ग असेल तर तो परशुरामाची देवभूमी मानल्या जाणाऱ्या निसर्गरम्य कोकणात! अशा देवभूमीत स्वर्गात आम्ही जन्माला आलो हेच आमचे भाग्य हिच आमच्या पूर्वजांची पुण्याई आणि हाच आशिर्वाद! अशा या देवभूमी स्वर्गात परंपरागत पद्धतीने, पिढ्यान-पिढ्या चालत आलेला तसेच थाटामाटात जल्लोषात धुमधडाक्यात ढोल ताशे मृदंगाच्या तालावर नाचत गाजत होळी व धुळीवंदन साजरे होत आहे.
अनेक वाड्या व ग्रामस्थ मिळून वेगवेगळ्या वाडीनुसार एक तारीख, एक वार ठरवून गावातील वाड्या वस्त्यांमध्ये एकोप्याने कुलदैवताला सजवलेल्या, रोषणाई करण्यात आलेल्या पालखीत बसवून प्रत्येक ग्रामस्थांच्या घरामध्ये देव विराजमान करून आणला जात आहे. “देव दाराशी येतो” हा शिमगोत्सव म्हणजे महाउत्सव ग्रामस्थ, चाकरमानी तसेच कोकणवासीयांसाच्या उपस्थितीत साजरा केला जातो. या शिमगोत्सवात वाडीतील ग्रामस्थ आणि गावकऱ्यांच्या, मानकऱ्यांच्या दारादारात गावदेवळातील देव बाहेर आणला जातो. सजवलेल्या पालखीत देव विराजमान करून थाटामाटात, वाजतगाजत प्रत्येकाच्या घरात नेऊन कुलदेव-दैवतांची मनोभावे पूजाअर्चा करून महिलांच्यावतीने ओटीभरणे केले जाते. ग्रामस्थांच्या गावकऱ्यांच्या मनातील इच्छा आकांक्षा स्वप्न मनोकामना पूर्ण व्हावीत, यासाठी पालखी सोबत असलेले पुजारी मार्फत पालखीतील कुलदैवताला आपल्या दैवताजवळ गाऱ्हाणे घातले जाते. देवासमोर नतमस्तक होऊन हा कोकणातील महाउस्तव शिमगोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो.
त्यानंतर पाच सहा दिवसांनंतर शिमगोत्सवाच्या शेवटी गावदेवळात पुन्हा देव आणून पून्हा पूजा करून महाप्रसाद वाटप करून गावदेवळात होळी-उत्सव व धुळीवंदन हा आपला मराठी माणसांचा सण एकोप्याने साजरा करत, जल्लोष करण्यात येतो. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी आमच्या खालगावचा शिमगोत्सव अतिशय आनंदाने, उत्साहाने मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. हा शिमगोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्व ग्रामस्थांचे योगदान मोलाचे लाभते.