(जाकादेवी/संतोष पवार)
रत्नागिरी तालुक्यातील खालगाव ग्रामपंचायतीतर्फे खालगाव येथे संपन्न झालेल्या ग्रामसभेत विधवा प्रथा बंदीचा निर्णय सरपंच प्रकाश खोल्ये यांनी घोषित केला. विधवा प्रथा बंदीचा घेतलेला निर्णय ग्रामसभेत सर्वानुमते संमती दर्शवून महिलांसह पुरुषांनीही विधवा प्रथा बंदीच्या निर्णयाचे टाळ्याच्या गजरात स्वागत केले.
पतीनंतर विधवा स्त्रियांना सामाजिक धार्मिक क्षेत्रामध्ये फार मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. काही प्रसंगी कटू अनुभव घेऊन जीवन व्यतीत करावे लागते. पती निधनानंतर स्त्रियांना स्वाभिमानाने जगता येण्यासाठी विधवा प्रथा बंदीचा निर्णय घेण्यामध्ये सरपंच प्रकाश खोल्ये, उपसरपंच कैलास खेडेकर यांनी आग्रही परिवर्तनवादी भूमिका मांडली. अजूनही विधवा स्त्रियांना अपमानास्पद वागणुकीला सामोरे जावे लागते ही स्थिती बदलली पाहिजे. पतीच्या मृत्यूनंतर विधवा स्त्रीचे दागिने उतरवणे, बांगड्या फोडणे, कुंकू पुसणे किंवा तिला धार्मिक व सामाजिक कार्यात अलिप्त ठेवणे अशा बाबी ज्या काही आजतागायत काही भागात चालू आहेत, या सर्व अज्ञानातून आणि अंधश्रद्धेतून निर्माण झाल्या आहेत. राष्ट्रीय महापुरुषांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा संदेश आपल्या जीवनात उतरला पाहिजे. पतीनंतर विधवा स्त्रियांना सन्मानाने आणि स्वाभिमानाने कुटुंब चालवण्यासाठी या अनिष्ट प्रथातून बाहेर काढण्यासाठी विधवा प्रथा बंदीचा निर्णय ग्रामसभेत गावाने घेतला आहे.
या झालेल्या ग्रामसभेमध्ये सरपंच प्रकाश खोल्ये, उपसरपंच कैलास खेडेकर, ग्रामपंचायत सदस्य व माजी सरपंच प्रकाश गोताड, चंद्रकांत जाधव, श्रद्धा रामगडे, दीप्ती धामणे, विनया गोताड ,दीपक कातकर, उमा देसाई, प्रियांका महाडिक, तेजस्वी कुळ्ये, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नूतन अध्यक्ष जयवंत जाधव, माजी अध्यक्ष नाना मुळ्ये, ग्रामविकास अधिकारी गुरूनाथ शिवगण यांसह कृषी सहाय्यक सुनिल कुरंग, खालगाव तलाठी सौ.परांजपे आरोग्य विभागाचे पर्यवेक्षक राजेसावंत, रत्नागिरी बाल प्रकल्प विभागाच्या सौ.केतकर यांसह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या सभेला उपस्थित होते.
या ग्रामसभेमध्ये सरपंच प्रकाश खोल्ये यांनी महाराष्ट्र रोजगार योजनेची विस्तृत माहिती दिली. मागासवर्गीय निधी स्वावलंबी कृषी योजना( अनुसूचित जाती) संदर्भात शासनाच्या अटी शर्ती समजावून सांगितल्या. खालगाव ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी गुरुनाथ शिवगण यांनी प्रशासकीय योजनांची सविस्तर माहिती देऊन ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रश्नांना सकारात्मक उत्तर देऊन विविध बाबी स्पष्ट केल्या.
या ग्रामसभेमध्ये शेतीविषयक, पीक पाणी योजना, आरोग्य विषयक तसेच हर घर तिरंगा या संदर्भात संबंधित अधिकारी वर्गाने ग्रामस्थांना बहुमोल असे मार्गदर्शन केले. हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत खालगावात ९०० ध्वज फडकवल्याबद्दल सरपंच प्रकाश खोल्ये उपसरपंच कैलास खेडेकर यांनी समाधान व्यक्त करत ग्रामस्थांनी अतिशय चांगल्या प्रकारे या उपक्रमाला सहकार्य केले.हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत वार्डनुसार टीमने केलेले काम हे खूपच वाखाणण्याजोगे असल्याचे सरपंच प्रकाश खोल्ये, उपसरपंच कैलास खेडेकर यांनी सांगितले.
ग्रामपंचायत कार्यालय, कार्यालयीन कर्मचारी, तलाठी कार्यालय, आरोग्य विभाग, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी शिक्षिका, प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, प्रतिनिधी,सामाजिक कार्यकर्ते, तरुण मित्र, महिला वर्ग, यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या शासकीय योजनेला मोलाचा हातभार दिल्याबद्दल तसेच शासकीय विविध उपक्रमात योगदान दिल्याबद्दल सरपंच प्रकाश खोल्ये, उपसरपंच कैलास खेडेकर यांनी ग्रामस्थांना मनापासून धन्यवाद दिले.
ग्रामपंचायत मध्ये गेले तीन दिवस 13, 14 ,15 ऑगस्ट रोजी महिलांच्या हस्ते ध्वज फडकवण्याची अभिनव संकल्पना देखील ग्रामपंचायतीने राबविली. प्रामुख्याने एप्रिल महिन्यात घरपट्टी भरणाऱ्या महिलांना ध्वज फडकवण्याचा सन्मान देण्यात आला.