(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील ग्रामपंचायत खालगाव येथे स्वातंत्र्याचा ७६ वा स्वातंत्र्यदिन महिला कार्यकर्त्या सौ.अल्पा कैलास खेडेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला अनुसरून शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार खालगाव ग्रामपंचायतीच्या वतीने हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत विविध कृती उपक्रम अतिशय उत्साहाने राबविण्यात आले. या सर्व कार्यक्रमांसाठी सर्व स्तरातून अतिशय चांगल्या प्रकारचे सहकार्य लाभले .यामध्ये खालगावचे सरपंच प्रकाश खोल्ये, उपसरपंच कैलास खेडेकर, ग्रामपंचायत सर्व सदस्य, माजी सैनिक मधुकर रामगडे ,माजी पोलीस पाटील प्रकाश जाधव, ग्रामविकास अधिकारी गुरुनाथ शिवगण, युवा नेते प्रतिक देसाई, बंटी सुर्वे, ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, बीट अंमलदार ,पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच खालगावातील ग्रामस्थ महिला तरुण वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
खालगाव ग्रामपंचायतीने आवाहन केल्याप्रमाणे १ एप्रिल रोजी घरपट्टी भरणाऱ्या महिलांना खालगाव ग्रामपंचायतीत ध्वजारोहणाचा बहुमान दिला जातो. त्या पद्धतीने यावर्षी ज्या महिलांनी आपली घरपट्टी १ एप्रिलला सर्व प्रथम भरली अशा महिलांना ध्वजारोहणाचा बहुमान देण्यात आला. यामध्ये 13 ऑगस्ट रोजी श्रीम. मिनाक्षी मोतिराम कोळंबेकर, 14 ऑगस्ट रोजी सौ.पुजा प्रशांत बेर्डे तर 15 ऑगस्ट रोजी महिला कार्यकर्त्या सौ. अल्पा कैलास खेडेकर या महिला भगिनींच्या हस्ते भारताचा राष्ट्रीय ध्वज अतिशय डौलाने फडकवण्यात आला. सोडत पद्धतीने या महिलांना संधी मिळाली. ग्रामपंचायतीने महिलांना दिलेल्या या बहुमानाबद्दल तसेच ग्रामपंचायतीच्या नेटक्या आणि अतिशय प्रभावी अंमलबजावणीबद्दल खालगाव- जाकादेवीसह संपूर्ण पंचक्रोशीतून या संकल्पनेचे कौतुक होत आहे.
१ एप्रिल रोजी घरपट्टी भरणाऱ्या महिलांमध्ये सर्व प्रथम सौ.दिपश्री दिपक गोताड या महिलेने बहुमान पटकावला होता. त्यांना१ मे रोजी ध्वज फडकवण्याचा बहुमान देण्यात आला होता. खालगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून माझी माती माझा देश या उपक्रमांतर्गत स्मृतीस्तंभ उभारणी आणि शहिदांना भावपूर्ण आदरांजली समर्पण, वृक्षारोपण, दिवे लावणे तसेच शासकीय मार्गदर्शक तत्त्वानुसार ग्रामपंचायतीच्या माध्यमातून धडाडीचे व उपक्रमशील सरपंच प्रकाश खोल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व टीमने अतिशय चांगल्या प्रकारे विविध कार्यक्रम संपन्न केले.
सदरचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत खालगाव व ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सर्व सहकारी यांनी खालगाव ग्रामपंचायतीच्या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद दिला.