(जाकादेवी/ वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील खालगाव ग्रामपंचायतीतर्फे जाकादेवी परिसरातील इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण तसेच विशेष गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पुष्प देऊन त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला. तसेच यावर्षी १२ वी बोर्ड परीक्षेत खालगावचे उपक्रमशील उपसरपंच कैलास खेडेकर यांनी उज्वल यश संपादन करून अनेकांना शिक्षणासाठी प्रेरित केले, एवढेच नव्हे तर पदवीधर होण्याची तीव्र इच्छा बाळगणाऱ्या कैलास खेडेकर यांचा ग्रामपंचायत खालगावतर्फे प्रेरक सत्कार करण्यात आला.
सदरचा सत्कार समारंभ उपक्रमशील सरपंच प्रकाश खोल्ये यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी युवा नेते व खालगावचे सक्रिय उपसरपंच कैलास खेडेकर, माजी सरपंच प्रकाश गोताड तसेच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, ग्राम विकास अधिकारी तसेच ग्रामपंचायतीचे कर्मचारीही उपस्थित होते. यावेळी परिसरातील इ. १० वी, १२वी बोर्ड परीक्षेत विशेष गुणवत्ता धारण केलेल्या तसेच उत्तीर्ण झालेल्या जाकादेवी परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत खालगावतर्फे प्रेरणादायी प्रमाणपत्र व पुष्प देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.