(जाकादेवी/ संतोष पवार)
रत्नागिरी तालुक्यातील खालगांव ग्रामपंचायत कार्यालयाला जाकादेवी येथील स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या माध्यमातून सुमारे ३५ हजार रुपये किमतीचा वॉटर कुलरची सुविधा देणगी रुपाने उपलब्ध करून दिली असून आता सर्वांसाठी खालगाव ग्रामपंचायत येथे थंड पाण्याची सुविधा सुरू झाली आहे.
ऐन उन्हाळ्याच्या हंगामात आवश्यक ती गरज ओळखून थंड पाण्याची सुविधा स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने पूर्णत्वास नेली आहे. या वॉटर कुलरच्या पूर्ततेसाठी खालगांव ग्रामपंचायतीचे कार्यतत्पर व उपक्रमशील सरपंच श्री. प्रकाश काशिनाथ खोल्ये, युवकांचे प्रेरणास्थान व गावचे उपसरपंच श्री. कैलास खेडेकर, सर्व सदस्य यांनी स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे धडाडीचे चेअरमन ॲड. दीपक पटवर्धन यांच्यासह त्यांच्या टीमला मनस्वी धन्यवाद दिले.
पतसंस्थेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपणारी स्वामी स्वरूपानंद पतसंस्था आहे. विविध योजनांबाबत या पतसंस्थेने ग्राहकांची विश्वासार्हता कायम जपली आहे.या पतसंस्थेने दिलेल्या वॉटर कुलरच्या उदात्त देणगी बदल खालगाव ग्रामपंचायतीच्या वतीने आभार व्यक्त केले. खालगांव ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व ग्रामस्थ, बाजारपेठेतील व्यापारी आणि अन्य नागरिकांना या वॉटरकुलर सुविधेचा लाभ होणार आहे.