(रत्नागिरी)
महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन यांच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सक्षम सहकार, सक्षम महिला पुरस्कार बेस्ट प्यून ते बेस्ट अध्यक्ष अशा विविध पदांवर पतसंस्थामधून काम करणाऱ्या महिलांकरिता पुरस्कारांचे वितरण दि.२४ मार्च, २०२३ रोजी नाशिक येथे करण्यात आले होते. अल्पावधीतच सहकार क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केलेली खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेच्या कु.प्रथमा मिरजुळकर यांना महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या बेस्ट क्लार्क, सक्षम सहकार, सक्षम महिला या पुरस्काराने नाशिक येथे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारती पवार यांच्या शुभहस्ते व महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
यावेळी मंचावर भारती पवार व काकाससाहेब कोयटे यांच्यासह, आशाताई शेलार, बंकर व अभिनेत्री, देवयानी फरांदे, आमदार नाशिक मध्य सीमाताई हिरे, आमदार नाशिक पश्चिम, रूपालीताई चाकणकर,अध्यक्षा महाराष्ट्र राज्य महिला आयोग या उपस्थित होत्या.
कु.प्रथमा पांडुरंग मिरजुळकर यांचे लौकिकदृष्ट्या बीकॉम, जीडीसी अँड ए पर्यंत शिक्षण झालेले आहे. 8 फेब्रुवारी 2020 पासून त्या खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेत क्लार्क पदावर काम करत आहेत. संस्थेच्या आजच्या प्रगतीमध्ये प्रथमा मिरजुळकर यांनी लक्षवेधी काम केले आहे. मिरजुळकर यांचे संस्थेच्या वतीने विशेष कौतुक करण्यात आले. समाजातील सर्वच स्तरातून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.