(रत्नागिरी)
खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था जिल्हा रत्नागिरीच्या पालशेत शाखेचा उद्घाटन सोहळा दिनांक २३/०७/२०२३ रोजी अध्यक्ष- गुहागर तालुका खारवी समाज समिति महेशजी नाटेकर, यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. उद्घाटन सोहळ्याच्या प्रारंभीच फटाक्यांच्या आतशबाजीने प्रमुख मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर मुख्य उद्घाटन सोहळा कार्यक्रम स्थानी मान्यवरांचे सुहासिनींच्या हस्ते औक्षण करण्यात आले.
या निमित्ताने श्री दत्त मंदिर हॉल पालशेत येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला मार्गदर्शन करताना सुधीर कांबळे (सहायक निबंधक प्रशासन), प्रभाकर शिरगावकर (अध्यक्ष-खारवी समाज गट क्र. ३,श्रीमती प्रेरणा शिरगावकर (अध्यक्षं महिला मंडळ, गुहागर तालुका खारवी समाज विकास समिती.), सिताराम पटेकर (अध्यक्ष-अखिल महाराष्ट्र खलाशी कष्टकरी महासंघ), चैतन्य धोपवकर (अध्यक्ष- गुहागर तालुका सरपंच संघटना), मुकेश अजगोलकर (अध्यक्ष-खारवी समाज क्रिकेट असोसिएशन , रत्नागिरी जिल्हा), पंकज बिर्जे (ग्रामपंचायत सद्यस्य) यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभली.
सभास्थानी मोठ्या संख्येने उपस्थित जनसमुदाय पाहून पतसंस्थेची नाळ ख-या अर्थाने समाजाशी जोडली गेली असल्याचे नमूद केले. आपण केलेली प्रगती समाधानकारक असून श्रेय अध्यक्ष व सर्व संचालक, प्रशासकीय अधिकारी यांना जाते. खारवी समाज जरी अल्प असला तरी त्यांची बांधणी केल्यामुळेच पतसंस्थेला यश मिळाल्याचे सांगून जास्तीत जास्त सभासद संख्या वाढवून व सामाजिक बांधिलकी जपत काम करणा-या पतसंस्थेचे कौतुक करून व विविध योजनांची माहिती देऊन त्याप्रमाणे पुढील वाटचाल करावी असे महेशजी नाटेकर यांनी उद्घाटक या नात्याने आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रम अध्यक्ष संतोष पवारी यांनी आपल्या मनोगतामध्ये ‘एक पाऊल आर्थिक सक्षमतेकडे…!’हे ब्रीदवाक्य खऱ्या अर्थाने सिद्ध करत व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञान, वाढती स्पर्धा, सामाजिक, राजकीय,आर्थिक आणि सहकार क्षेत्रातील घडामोडींचा पतसंस्थेच्या कार्यभागावरही प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम होत असताना सुद्धा खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेचे अल्पावधीतच शाखा विस्तार करण्यामध्ये यश प्राप्त केले. पालशेत शाखेच्या उभारणीमध्ये ज्यांनी ज्यांनी हातभार लावला. त्या सर्व सभासद बंधु भगिनी यांचे आभार व्यक्त करून पालशेत शाखा भरभराटीस येईल यासाठी सर्वांनी सभासद व्हावे, ठेवी ठेवाव्यात व कर्ज घ्यावे असे आवाहन केले.
या कार्यक्रमाला सर्व जिल्हाभरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने व उस्फुर्त हजेरी लावली. यामध्ये मातृशक्ती ची उपस्थिती लक्षणीय होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्था मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसादजी खडपे यांनी तर सूत्रसंचालन संचालक दिनेश जातकर यांनी केले. सर्वांचे आभार विकास दाभोळकर यांनी मानले.