[ नवी दिल्ली ]
ऑगस्ट महिन्यात देशातील किरकोळ महागाई दर वाढून ७ टक्क्यांवर पोहचला आहे. यामुळे पुन्हा व्याजदर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोमवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार, ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) आधारित किरकोळ महागाई जुलैमधील ६.७१ टक्क्यांवरून ऑगस्टमध्ये ७ टक्क्यांवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये हा दर ५.३० टक्के होता. देशात महागाई प्रचंड वाढलेली आहे. देशात खाद्यपदार्थांच्या तसेच घरगुती वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत हेच किरकोळ महागाई दरातील वाढ स्पष्टपणे सूचित करत आहेत.
मागील ८ महिन्यांपासून ग्राहक किंमत निर्देशांकाची पातळी भारतीय रिझर्व्ह बँकेने निर्धारित केलेल्या ६ टक्के मर्यादेपेक्षा पूर्ण १ टक्का जास्त आहे. ऑगस्ट महिन्यात शहरी आणि ग्रामीण भागात अन्नधान्याच्या किमतीत वाढ झाली आहे. शहरी भागातील अन्नधान्य महागाई दर जुलैमध्ये ६.६९ टक्क्यांवरून ७.५५ टक्क्यांवर नोंदवण्यात आला आहे, तर ऑगस्ट २०२१ मध्ये शहरी भागात ३.२८ टक्के खाद्यान्न महागाई दर नोंद करण्यात आला आहे, तर ग्रामीण भागात हाच महागाई दर ७.६० टक्क्यांवर नोंदविण्यात आला आहे.