मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये अजित पवार यांची एन्ट्री झाल्याने सत्ताधारी आमदारांमध्ये मोठी नाराजी आहे. सरकार समकर्थक आमदार बच्चू कडू यांनी ही नाराजी स्पष्ट व्यक्त केली आहे. अजित पवार गटाची एन्ट्री झाल्याने नाराजी असणे स्वाभाविक आहे. त्यातच जर त्यांच्याकडे अर्थखाते गेले तर मोठी अडचण होऊ शकते, अशी काहींची भावना आहे, असेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
राज्य सरकारमध्ये सध्या बदललेल्या स्थितीमध्ये खूप गोष्टी काळजीपूर्वक कराव्या लागतील. त्या केल्या तर ठीक आहे. नाहीतर सगळाच बिघाडा होऊ शकतो. वरवर दिसायला सगळ्या गोष्टी सोप्या वाटत असल्या तरी आतून त्या तितक्या सोप्या नाहीत. त्यात अनेक गोष्टी असतात, मंत्रिपदं, खातेवाटप, पालकमंत्री पद अशा अनेक गोष्टी असतात. त्यावरुनही नाराजी-आनंद असतो. त्यामुळे सगळ्या गोष्टी विचारात घेऊनच निर्णय घ्यावा लागतो, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. यावरून त्यांनी सरकारमध्ये सर्वच काही अलबेल नसल्याचे आपल्या विधानांमधून दाखवून दिले आहे.
बच्चू कडू सध्या त्यांच्या मतदारसंघात आहेत. याबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना विचारले असता ते म्हणाले मंत्रिपदासाठी मुंबईतच थांबायला लागते असे काही नाही. इतरांमध्ये आणि बच्चू कडू यांच्यात हाच नेमका फरक आहे. मी कोणाच्या वाकड्यात जात नाही आणि जर कोणी बच्चू कडूच्या वाकड्यात गेले तर मात्र तो वाटोळे करतो. मला कोणत्याही पदाची, मंत्रिपदाची आपेक्षा नाही. आपण ससत काम करत असतो. पद असले नसले तरी काम हे करावेच लागते. त्यामुळे आपण सध्या आपल्या मतदारसंघात आहोत. पाहूया काय होतंय, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.