(मुंबई)
अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांसह सत्तेत सहभागी झाल्याने शिवसेनेत (शिंदे गट) नाराजी असल्याची चर्चा असतानाच आता खाते वाटपावरूनही तिढा निर्माण झाल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीचे मंत्री सीनियर असल्याने त्याचप्रमाणात खाती मिळावी, अशी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची ठोक भूमिका आहे. मात्र, आपल्याकडील खाते सोडण्यास भाजप, शिंदे गटाचा विरोध आहे. त्यामुळे यात पराकोटीचा संघर्ष होण्याची चिन्हे असून खाते वाटपाला आणखी काही दिवस लागू शकतात, असे म्हटले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना सत्तेत सामील होताना दिलेली आश्वासने पूर्ण होत नसल्याची चर्चा आहे. भाजप आणि शिंदे गटाकडे असलेली खाती काही मंत्री सोडायला तयार नाहीत तर राष्ट्रवादीचे मंत्री सीनियर असल्याने त्याचप्रमाणात खाती मिळावीत, अशी भूमिका राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची आहे. त्यामुळे हा तिढा सोडविण्यासाठी पुन्हा एकदा तीनही पक्षांत चर्चा होणार आहे.
अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदासह जलसंपदा हे खाते असेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. यासोबतच छगन भुजबळांना अन्न व नागरी पुरवठा, दिलीप वळसे पाटील यांच्याकडे ऊर्जा, हसन मुश्रिफांकडे कौशल्य विकास, धनंजय मुंडेंकडे गृहनिर्माण खाते देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. खरे तर शिंदे गट आणि भाजपमधील काही नेत्यांनी अगोदरच मंत्रिपदावर डोळा ठेवला होता. मात्र, अजित पवारांमुळे त्यांची गोची झाली आहे. त्यातच आता भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांनी खातेबदलास विरोध केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे खातेवाटप रखडणार आहे. एकीकडे खातेवाटपाचा तिढा असतानाच पालकमंत्रिपदावरूनही मतभेद असल्याचे समोर आता आले आहे.