(संगमेश्वर)
खाजगी आणि कंत्राटी प्रवासी वाहनांकडून मनमानी भाडे आकारणी होत असून शासनाने कमाल भाडे दर आकारणीबाबत दिनांक 27 एप्रिल 2018 रोजी आदेश काढलेले असताना अधिकारी आणि खाजगी प्रवासी वाहतूकदार यांच्या संगनमताने असे प्रकार होत आहेत, अशी प्रवाशांमध्ये चर्चा होत आहे. त्याचप्रमाणे प्रवासी बसेसमध्ये नियमानुसार सुविधा नसल्याने या बसेस पासींग कशा होत आहेत याचीही चर्चा होत आहे.
याबाबत माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघ मुंबईचे संगमेश्वर तालुक्याचे वतीने तसेच महाराष्ट्र समविचारी मंच संगमेश्वरचे वतीने विभागाला अर्ज देण्यात आले होते. त्यामध्ये रात्री कोणतीही चेकिंग होत नसल्याचे निदर्शनास आणले होते. तसेच अनेक टू व्हीलर, रिक्षा, खाजगी फोर व्हिलर, खाजगी बसेस मालवाहतूक गाड्या यांना नियमबाह्य चायनीज प्रखर लाईट बसविलेले असून त्याचा समोरील वाहनांवर परिणाम होऊनअपघात होण्याचा संभव असतो. त्याबाबत कार्यवाही करणेबाबत मागणी करण्यात आलेली असतानाही कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. फक्त हेल्मेट, पीयुसी, लायसन्स याबाबत तपासणी करण्यात येत आहे.
रात्री चेक पोस्ट नसल्याने अशा वाहनांवर कार्यवाही होत नसल्याने शासनाचा महसूल शासनाचेच विभाग बुडवीत आहेत. याबाबत माहितीचा अधिकार अंतर्गत परिपूर्ण माहिती मागवली जाईल. त्यामध्ये रात्री कुठे चेकिंग केले जात आहे. कोणत्या गाड्या तपासल्या गेल्या, त्याबाबतचे तारखेसह फोटो व आवश्यक कागदपत्रांची मागणी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे देवरूख शहरातही वाहनाची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असून अनधिकृत प्रखर लाईट, मीटर सुरू नाहीत, ड्रेस बॅच नाहीत, अशा अनेक तक्रारी येत आहेत. त्यासाठी देवरूख शहरात ट्रॅफिक पोलिस उपलब्ध व्हावे यासाठी संबंधित अधिकारी यांना पत्रव्यवहार करूनही दुर्लक्ष करण्यात आले आहे. या पत्रव्यवहाराला केराची टोपली दाखविणाऱ्या अधिकारी वर्गावर दप्तर दिरंगाई अधिनियम 2006 चे कलम 1,2, व 3 नुसार कार्यवाही करण्याबाबत तक्रार अर्ज करण्यात येणार आहे असे माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघ मुंबईचे संगमेश्वर तालुक्याचे अध्यक्ष मनोहर गुरव यांनी सांगितले आहे.