(खेड / भरत निकम)
महामार्गावर खवटी येथील हाॅटेल अनुसयाजवळ अमली पदार्थ घेऊन जाणाऱ्या इको गाडीत १ किलो ८०० ग्रॅम वजनाचा गांजा खेड पोलिसांनी जप्त केला. या कारवाईत हस्तगत केलेला एकूण माल ५ लाख ४४ हजार २१२ रुपये किंमतीचा असून खेड पोलिसांचे जनतेतून कौतुक होत आहे.
खेड पोलिस ठाण्यात शिपाई कृष्णा बांगरना गुप्त माहिती मिळाली होती. पोलिस निरीक्षक नितीन भोयर यांनी राहुल कोरे, अजय कडू, ओहोळ यांच्यासमवेत मुंबई गोवा महामार्गावर तुळशीफाटा येथे सापळा लावला होता. वाहतूकीवर लक्ष ठेवण्यास पल्सर दुचाकी (क्र.एमएच ०८ एएस १६४३) ही पुढे जात माहिती देत होती. त्यांच्यापाठी मारुती इको (क्र.एमएच ०८ एएन ७१५८) ही संशयास्पद जात असताना पोलिस पथकास दिसली. तिचा पाठलाग करीत महामार्गावरील खवटी येथील हाॅटेल अनुसयानजीक ही इको पथकाने पकडली. गाडीची तपासणी केली असता एका पिशवीत ठेवलेला १ किलो ८०० ग्रॅम वजनाचा गांजा सापडला.
इको चालक रवींद्र सहदेव जाधव (४५, रा. सिध्दार्थ नगर, भटवाडी, घाटकोपर मुंबई) याला पथकाने ताब्यात घेतले. इको गाडीची किंमत ५ लाख, १ किलो ८०० ग्रॅम वजन गांजाची किंमत २७ हजार ७२, रेडमी कंपनीचा एक मोबाईल १० हजार, अकटेल कंपनीचा एक मोबाईल १ हजार, प्लास्टिक पिशव्या ५० किंमतीच्या, असा एकूण ५ लाख ४४ हजार २१२चा मुद्देमाल पथकाने जप्त केला आहे. याप्रकरणी रवींद्र जाधव याच्याविरोधात पोलिस ठाण्यात अमली औषधी द्रव्य व मन प्रभावी पदार्थ अधिनियम १९५८चे कायदा कलम ८(क), २०(ब), २(ब) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याची फिर्याद कृष्णा बांगर यांनी दिली. तसेच पल्सर दुचाकीवर लक्ष ठेवणारा इसम फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेताहेत.
सखोल चौकशी व्हावी
महामार्गांवर इकोतून गांजा वाहतूक करुन कुठून कुठे नेला जात होता? तो खरेदी कुठून करुन आणला गेला? सराईतपणे गांजा अमली पदार्थांची वाहतूक संशयित रवींद्र जाधव हा करत होता का? या प्रश्नांची उत्तरे पोलिस पथकाने शोधून काढली पाहिजेत, अशी मागणी केली जात आहे.
अमली पदार्थांचे समुळ उच्चाटन
रत्नागिरी जिल्ह्यात अनेक तरुण अमली पदार्थ सेवन प्रमाणात वाढ झाली आहे. चिपळूण, राजापूर, रत्नागिरी येथे अल्पवयीन मुलांसह तरुण पकडले गेलेत. बऱ्याच ठिकाणी भावीपिढी नशेच्या आहारी जातेय, अशी तीव्र भावना जिल्ह्यात नागरिक व्यक्त करीत आहेत. याची गंभीर दखल जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी घेतली असून अमली पदार्थ खरेदी विक्रीचे समुळ उच्चाटन करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
नागरिकांनी माहिती द्यावी
जिल्हा पोलिस दल अमली पदार्थ खरेदी, विक्री, वाहतूक व जवळ बाळगणे या गुन्ह्याखाली मोहीम राबवत आहे. या अनुषंगाने अमली पदार्थांची माहितीबाबत नागरिक यांनी जवळच्या स्थानिक पोलीस ठाण्यात माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे.