(जळगाव)
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे व भाजप नेते गिरीश महाजनांचा संघर्ष राज्याला माहीत आहे. गेल्या काही दिवसांपासून तर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि भाजप आमदार गिरीश महाजन यांच्यात विखारी शब्दप्रयोग चालू आहेत. स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटाकडून टोकाचा संघर्ष होताना दिसत आहे. नुकतेच खडसे यांनी बरं झालं महाजनांना मुलगा नाही असं वक्तव्य केलं होत. यावर मंत्री गिरीश महाजन यांनी आज खडसेंना त्यांच्या मुलाच्या मृत्यूची आठवण करून देत जोरदार हल्लाबोल केला आहे. एकनाथ खडसे यांच्या मुलाची हत्या झाली की आत्महत्या आहे? असा सवाल करत महाजन यांनी एकनाथ खडसेंना डिवचले आहे.
गिरीश महाजन यांनी खडसेंना प्रत्युत्तर देताना म्हटले आहे की, खडसे आजकाल काय बोलत आहेत. याचे त्यांना भान नाही. मुलगा नसणं हे काही दुर्दैव नाही. मात्र मला दोन मुली आहेत हे माझं सुदैव आहे. एकनाथ खडसे यांना मुलगा होता, त्याचं काय झालं? त्याचं उत्तर खडसे यांनी द्यावं. हा विषय मला बोलायचा नाही. मात्र खडसेंच्या मुलाच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करण्याची गरज आहे. मला जास्त बोलायला लावू नका. त्यामध्येच त्यांचे भले आहे. खरंतर मला याबाबत बोलायचे नव्हते. मात्र ते जर माझ्या मुलाबाळांवर जात असतील तर ते वाईट आहे. तुम्हाला एक मुलगा होता त्याचं काय झालं? आत्महत्या झाली की खून झाला हे आता तपासण्याची गरज असल्याचा इशारा गिरीश महाजन यांनी खडसे यांना दिला आहे.
महाजन म्हणाले की, खडसेंच्या अनेक भानगडी बाहेर येत असल्याने ते बेभान झाले आहेत. कधी मला चावट म्हणतात, कधी उगीच बदनामी करतात. त्यांची परिस्थिती बघता त्यांची मानसिक स्थिती बिघडणं स्वाभाविक आहे. मुख्यमंत्री लेव्हलचा माणूस असताना ते काहीही बोलत आहेत, अशी टीकाही गिरीश महाजन यांनी केली आहे. भोसरी भूखंड प्रकरण, जिल्हा दूध संघ प्रकरण यासारख्या अनेक चौकशा सुरू आहेत. त्यात सबळ पुरावे मिळत आहेत. त्यामुळे खडसे अस्वस्थ झाले आहेत. त्यातून अशी विधाने ते करत असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.
महाजनांच्या या वक्तव्यावर एकनाथ खडसे यांनी देखील टीका केली आहे. गिरीश महाजन यांना सध्या काय बोलावे हे सुचत नाही. एवढ्या खालच्या पातळीचं राजकारण मी कधीच केलं नाही. माझ्या मुलाची हत्या झाली की आत्महत्या झाली हे तपासायला माझी काही हरकत नाही. केंद्रात आणि राज्यात त्याचं सरकार आहे. त्यामुळे त्यांनीच याचा तपास करावा.
.