(वैभव पवार, गणपतीपुळे)
रत्नागिरी तालुक्यातील वाटद-खंडाळा येथे महावितरण कार्यालयाच्या समोरील मुख्य रस्त्यावर बुधवारी सायंकाळी झालेल्या ॲक्टिवा व बलगर या दोन वाहनांमध्ये झालेल्या भीषण अपघातात कोळीसरे बौद्धवाडी येथील दहा वर्षीय दर्शिल प्रमोद सावंत या चिमुरड्याचा जागीच करुण अंत झाला. तर त्याचे आजोबा रामचंद्र देमा सावंत हे जखमी झाले. या घटनेच्या आधीही कंपनीच्या ओव्हरलोड व अवजड वाहतुकीमुळे दहा जणांचा बळी गेल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांकडून देण्यात आली. त्यामुळे अपघाताची हीच पुनरावृत्ती बुधवारी घडून आल्याने येथील संपूर्ण खंडाळा पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले आहेत. या ग्रामस्थांनी यापुढे जयगड परिसरातील सर्व कंपन्यांची ओव्हरलोड अवजड वाहतूक बंद झालीच पाहिजे, असा आक्रमक पवित्रा घेतला असून जोपर्यंत या कंपनीकडून सकारात्मक उपायोजना केल्या जात नाहीत तोपर्यंत खंडाळा ते जयगड मार्गावर ओव्हरलोड अवजड वाहतूक सुरू होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका खंडाळा परिसरातील बौद्ध बांधव व सर्वच समाजातील स्थानिक ग्रामस्थांनी घेतली आहे.
बुधवारी सायंकाळी खंडाळा येथे भीषण अपघात झाल्यानंतर एका लहान बालकाचा जागीच करुण मृत्यू झाल्याने खंडाळा पंचक्रोशीतील संपूर्ण बौद्ध बांधव एकवटले होते. यावेळी बौद्ध बांधवांच्या एकजुटीचे दर्शन खऱ्या अर्थाने दिसून आले. यामध्ये तरुणांचा सहभाग लक्षणीय होता. सर्व तरुणांनी आक्रमक भूमिका घेऊन स्थानिक कंपनीच्या विरोधात जोरदार आगपाखड केली. त्यानंतर अशीच ठाम भूमिका गुरुवारी दुपारपर्यंतही बौद्ध बांधवांनी लावून धरल्याने संपूर्ण खंडाळा भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. येथील संतप्त तणावाचे वातावरण लक्षात घेऊन जयगड पोलिस ठाण्याच्यावतीने संपूर्ण खंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दरम्यान, खंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात बौद्ध बांधवांच्या एकजुटीचे दर्शन घडताच तणावाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर संपूर्ण परिस्थिती पोलीसांनी मोठ्या शिताफीने आवरली आणि त्यानंतर त्या ठिकाणी संबंधित कंपनीचे अधिकारी पोहोचल्याने अधिकारी व ग्रामस्थ यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी अपघातात मृत्यू झालेल्या बालकाच्या कुटुंबीयांना घेऊन सकारात्मक चर्चा करण्यात आली. त्यामध्ये नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आले. त्यामध्ये रोख स्वरूपात पाच लाख रुपयांची मदत तर इन्शुरन्स च्या स्वरूपात 25 लाखापर्यंत विमा रक्कम देण्याची देण्याची तयारी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दर्शवली आहे. त्यानंतर मृत झालेल्या बालकाच्या कुटुंबातील एकाला कंपनीमध्ये नोकरी देण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे. या गोष्टींची पूर्तता झाल्यानंतर बालकाचा मृतदेह हाती घेण्यात आला. परंतु यापुढे अशा कंपनीची वाहतूक पाहता अशा दुर्घटना घडणार नाहीत यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी लावून धरली आहे. याबाबत शुक्रवारी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा रत्नागिरी तालुक्याचे आमदार उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी खंडाळा येथील काका मुळये यांच्या निवासस्थानी एक महत्त्वपूर्ण बौद्ध बांधव, स्थानिक ग्रामस्थ व पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी अवजड वाहतूक बंद करणेबाबत व पुढील दिशा निश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाणार आहेत. दरम्यान, बुधवारी सायंकाळच्या सुमारास भीषण अपघात होऊन देखील पोलीस यंत्रणांव्यतिरिक्त इतर कुठल्याही खात्याचा अधिकारी खंडाळा भागात फिरकला नसल्याने संपूर्ण खंडाळा भागातील बौद्ध बांधवांनी व इतर सर्व समाजातील ग्रामस्थानी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अशा घटना घडत राहिल्या तर शासन प्रशासन म्हणून जनतेला कोण वाली आहे की नाही असा प्रश्न आता विचारला जात आहे. तसेच एखाद्या लहान मोठ्या वाहनांवर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करणाऱ्या आरटीओ अधिकाऱ्यांचे ही लक्ष आहे का? असा प्रश्न देखील आता विचारला जात आहे.
या भीषण अपघातानंतर आरटीओ अधिकारी फिरलेले नाहीत त्यांनी कंपनीच्या विरोधात अवजड वाहनांची अवजड वाहनांची वाहतूक करताना त्याची क्षमता किती प्रमाणात पाहिजे किंवा किती मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरू आहे याकडे कुठलेही लक्ष नसल्याचे ग्रामस्थांकडून वारंवार सांगितले जात आहे. एवढी मोठी दुर्घटना होऊन देखील आरटीओ अधिकारी व अन्य खात्याचा आणि महत्त्वाचे म्हणजे जिल्हा अधिकारीदेखील फिरकले नसल्याने तीव्र नाराजी व संताप व्यक्त केला जात आहे. गुरुवारी रत्नागिरी दौऱ्यावर आलेले परिवहन तथा रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब हे गणपतीपुळ्याच्या मंदिरात देवदर्शनासाठी येऊन गेले. परंतु खंडाळा भागात बुधवारी सायंकाळच्या सुमारास भीषण अपघातात एका चिमूरड्या चा अंत झाल्याची बातमी अनेकांपर्यंत पोहोचली. याची माहिती रत्नागिरीचे पालकमंत्री तथा राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचे पर्यंत निश्चितच पोहोचली असणार असा ठाम समज ग्रामस्थांच्या झालेला असताना आज गुरुवारी रत्नागिरीचे पालकमंत्री तथा परिवहन मंत्री अनिल परब गणपतीपुळे येथे देव दर्शनासाठी आल्याची माहिती येथील ग्रामस्थांना कळली मात्र, एवढा मोठा भीषण अपघात झाल्यानंतर मंत्री फिरकलेही नसल्याने स्थानिकांमध्ये रोष होता. याविषयी पत्रकारांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की त्यांचा शासकीय दौरा निश्चित होता, त्यामुळे या दौऱ्याव्यतिरिक्त ते खंडाळा येथे येऊ शकले नाहीत. मात्र यापुढे अशा घटनांना पायबंद बसणार तरी कधी असा? असा संतप्त प्रश्न आता बौद्ध बांधव व खंडाळा भागातील स्थानिक ग्रामस्थांनी केला जात आहे