(मुंबई)
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात रविवारी रात्री विद्यार्थ्यांची बस उलटली आहे. संबंधित बस ४८ जणांना घेऊन लोणावळा येथून चेंबूरच्या दिशेने जात होती. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून घाट उतरत असताना ही बस उलटली. या दुर्दैवी घटनेत दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर ६ विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. संबंधित सर्व विद्यार्थ्यांना लोणावळा, खोपोली आणि आजूबाजूच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे विद्यार्थी लोणावळ्यातील एका जल क्रीडा केंद्रात (वॉटर पार्क) सहलीसाठी रविवारी आले होते.
रविवारी रात्री लक्झरी बस लोणावळा येथून चेंबूरच्या दिशेने जात होती. या बसमधून चेंबूर येथील मयांक कोचिंग क्लासेसचे दहावीच्या वर्गातील एकूण ४८ विद्यार्थी प्रवास करत होते. कोचिंग क्लासचे २ शिक्षकही बसमध्ये होती. ही बस जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून चेंबूरच्या दिशेने जात होती. यावेळी घाट उतरत असताना रात्री आठच्या सुमारास मॅजिक पॉईंटजवळ ही बस डाव्या बाजूला उलटली.
या अपघातात जवळपास सर्व विद्यार्थी जखमी झाले आहे. जखमी विद्यार्थ्यांना लोणावळा, खोपोली व आजूबाजूच्या परिसरातील विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. या दुर्दैवी घटनेत एक मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू झाला. क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त बसला बाजूला घेण्यात आली असून वाहतूक सुरळीत करण्यात आलेली आहे.