(पुणे)
खंडाळा घाटात मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळली. यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणा-या एक्स्प्रेस वेवरील तिन्ही मार्गिका वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. सध्या एक्स्प्रेस वेवरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
पुणे जिल्ह्यातील लोणावळा भागात पावसाचा सर्वात जास्त जोर आहे. विक्रमी पावसाची नोंद या भागात नोंदवली गेली. आता ही दरड कोसळल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे रस्त्यावर पडलेला राडारोडा काढण्याचे काम तात्काळ सुरू करण्यात आले. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर साधारण दहा ते साडेदहाच्या सुमारास ही दरड कोसळल्याची घटना घडली. त्यामुळ तीनही लेनवरची वाहतूक ठप्प झाली. महामार्ग वाहतूक यंत्रणेच्या वतीने मार्गिका बदलण्याचे काम सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर दरड कोसळल्याने सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक बंद करण्यात आली आहे. प्रवाशांनी सावधगिरी बाळगावी. आयआरबी कर्मचारी, बोरघाट वाहतूक पोलिस आणि खोपोली पोलिस ठाण्याचे अधिकारी-कर्मचा-यांकडून रस्ता खुला करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही.