(जाकादेवी /वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील ग्राम विकास मंडळ वाटद मिरवणे संचलित खंडाळा इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये वाचन प्रेरणा दिन व जागतिक हात धुवा दिन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
भारतातील युवा पिढीला आदर्शवत असे व्यक्तिमत्व म्हणजे भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम. 15 ऑक्टोबर हा माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतभर “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा केला जातो. शालेय शिक्षण कमिटी सदस्य श्री. मारुती शीतप यांनी अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले. त्यानंतर शिक्षिका सौ. ऐश्वर्या कनावजे यांनी अब्दुल कलाम यांचा जीवन परिचय करून दिला. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलचा वापर वाढल्याने वाचकांची संख्या कमी झाली आहे. परंतु विद्यार्थ्यानी मोबाईलपेक्षा पुस्तक वाचण्याचा छंद जोपासला पाहिजे. “वाचाल तर वाचाल” हा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला. वाचन प्रेरणा दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये वाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली असून त्यातून उत्तम वाचक निवडण्यात येणार आहे. तसेच आज जागतिक हात धुवा दिनानिमित्त विद्यार्थ्यांंना हात धुण्याचे योग्य मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक श्री. आशिष वासावे, कमिटी सदस्य श्री. मारुती शितप, पर्यवेक्षक श्री. शरद पावसकर, श्री. स्वप्निल जाधव, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभागाने उत्तमरीत्या योगदान दिले.