(क्रीडा)
भारतीय क्रिकेट संघात शुभमन गिलच्या रूपाने एक नवा झंझावाती फलंदाज दाखल झाला आहे. विराट कोहलीला मागे टाकत टी-२० श्रेणीत भारताकडून सर्वांत मोठी खेळी करणारा फलंदाज म्हणून शुभमन नावारूपाला आला आहे. कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० या तिन्ही प्रकारांमध्ये शुभमनच्या तळपत्या बॅटने धावांचा वर्षाव केला आहे. टीम इंडिया सध्या संक्रमण काळातून जात आहे. आता भविष्यातील खात्रीशीर फलंदाज फलंदाज म्हणून शुभमनकडे पहिले जात आहे.
भारतीय क्रिकेट जगतात नव्याने उदयास येणा-या शुभमन गिलची छाप सर्वत्र पडली आहे. अलीकडेच संपलेल्या न्यूझिलंडविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेत त्याची कामगिरी दमदार राहिली. एकदिवसीय मालिकेत शुभमनने करिअरमधील द्विशतक झळकावले. तर टी-२० मध्ये भारताकडून सर्वांत मोठी खेळी करणारा फलंदाज ठरला. अहमदाबाद येथे न्यूझिलंडविरुद्धच्या टी-२० सामन्यात त्याने नाबाद १२६ धावा ठोकल्या. या खेळीने विराट कोहलीला मागे टाकत या श्रेणीत तो भारताकडून सर्वांत मोठी खेळी करणारा फलंदाज ठरला.
शुभमनची अलीकडच्या काळातील चमकदार कामगिरी पाहता टीम इंडियाला नवा स्टार मिळाला आहे, हे आता सिद्ध झाले आहे. शुभमन हा केवळ क्रिकेटच्या मैदानावर नाही तर मैदानाबाहेरही चर्चेत असतो. अलीकडेच शुभमन हा सारा तेंडुलकरच्या मैत्रीवरून चर्चेत राहिला आहे.
शुभमनचे शिक्षण पदवीपर्यंत झाले आहे. अंंडर-१९ मध्ये दबदबा निर्माण करण्याअगोदर शुभमनने अंडर-१६ मध्ये करिष्मा दाखविला होता. पंजाबच्या इंटर डिस्ट्रिक्ट स्पर्धेत शुभमनच्या बॅटीतून ३५१ धावा निघाल्या. या कामगिरीने शुभमनने लोकांचे लक्ष वेधून घेतले. कालांतराने पंजाबच्या वरिष्ठ क्रिकेट संघात प्रवेश मिळाला. अंडर-१९ विश्वचषकापूर्वी पंजाबकडून विजय हजारे आणि रणजी ट्रॉफीत पदार्पण केले. प्रथम श्रेणीत खेळताना दुस-याच सामन्यात त्याने शतक झळकावले. वयाच्या १७ व्या वर्षी त्याची भारत अंडर-१९ संघात निवड झाली. २०१८ मध्ये अंडर-१९ च्या विश्वचषकासाठी उपकर्णधार म्हणून निवडले. शुभमनला अंडर-१९ विश्वचषकापासूनच नवीन अोळख मिळाली आणि आजतागायत ती कायम आहे.
न्यूझिलंड आणि वेस्ट इंडिजमध्ये धावा तडकावल्या आणि त्यानंतर अंडर-१९ चा विश्वचषक जिंकल्यानंतर एक वर्षाच्या आतच टीम इंडियाने त्याला न्यूझिलंडच्या दौ-यात एकदिवसीय श्रेणीसाठी पाचारण केले. विशेष म्हणजे त्याची यावेळी बॅट फार तळपलेली नव्हती. कारण त्याची धावसंख्या ९ आणि ७ होती. शुभमनने टीम इंडियासाठी आतापर्यंत एकूण १३ कसोटी, २१ एकदिवसीय आणि ६ टी-२० सामने खेळले. कसोटीत त्याने ७३६ धावा केल्या. त्यात चार अर्धशतके आणि एका शतकाचा समावेश आहे. याशिवाय एकदिवसीय सामन्यात शुभमनच्या नावावर १,२५४ धावा आहेत. या श्रेणीत त्याने चार शतकं ठोकली आहेत. तसेच टी-२० मध्ये २०२ धावा केल्या आहेत.
चालू वर्षातील जानेवारीचा महिना शुभमनसाठी विशेष राहिला. यात त्याने श्रीलंका आणि न्यूझिलंडविरुद्ध एकदिवसीय आणि टी-२० मालिकेत धावांचा पाऊस पाडला. त्याने ३२ दिवसांत ७६९ धावा तडकावल्या. यात त्याची सरासरी ७६.९० आणि स्ट्राईक रेट १३४ राहिला. त्यात चार शतकं आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे.