चिपळूण : अलोरे शिरगाव येथे दोन संघांमध्ये क्रिकेटचा सामना होत असताना एका संघाने दुसर्या संघातील खेळाडूंवर हरकत घेतली. हरकत घेतलेल्या खेळाडूंना आयोजकानी बाहेर जाण्यास सांगितल्याने बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले. यामध्ये एकजण जखमी झाल्याची घटना 19 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वा. च्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश सिताराम खेतले (50, मुंढे वरचीवाडी, चिपळूण) हे आपल्या वाडीतील लोकांसह मुंढे मधलीवाडी येथे क्रिकेटचे सामने पाहण्यासाठी गेले होते. दत्त मित्रमंडळ मुंढे वरचीवाडी व सोमेश्वर मित्रमंडळ तळसर यांच्या क्रिकेटचा सामना सुरु होणार होता. यादरम्यान प्रकाश यांच्या संघावर सोमेश्वर संघाने हरकत घेतल्याने आयोजकांनी प्रकाश खेतले यांच्या संघाला बाहेर जाण्यास सांगितले. या दरम्यान आयोजक व खेतलेंच्या संघातील खेळाडूबरोबर वादावादी सुरु झाली. यात महादेव तुकाराम खेतले याने पाठीमागून मारले. पाठीमागून काय मारतोस तोंडाने बोल असे म्हटल्यावर राग आलेल्या महादेव याने प्रकाश सिताराम खेतले यांच्या डोक्यात बॅट घातली. यामध्ये प्रकाश जखमी झाले.
याबाबतची फिर्याद त्यांनी अलोरे पोलीस स्थानकात दिली. त्यानुसार पोलसांनी मारहाण करणार्या महादेव खेतले याच्यावर भादविकलम 324 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.