(क्रीडा)
RCB ने IPL 2023 च्या त्यांच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा आठ गडी राखून पराभव केला. आरसीबीच्या विजयाचे हिरो विराट कोहली आणि कर्णधार डूप्लेसिस ठरले. दोन्ही खेळाडूंनी मिळून शतकीय भागिदारी रचली. दोन्ही अनुभवी फलंदाजांनी अर्धशतकी खेळी खेळली.
या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर मुंबई इंडियन्सने २० षटकात ७ विकेट गमावत १७१ धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबी संघाने १६.२ षटकात २ बाद १७२ धावा करत सामना जिंकला.
पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी
१७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीला कोहली आणि डुप्लेसिसने चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. कोहली आणि डुप्लेसिसने १४.५ षटकांत १४८ धावा जोडल्या. डुप्लेसिस ४३ चेंडूत ७३ धावा करून बाद झाला. त्याने पाच चौकार आणि सहा षटकार मारले. त्याचा स्ट्राईक रेट १६९.७७ होता. त्याचवेळी कोहलीने ४९ चेंडूत नाबाद ८२ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत सहा चौकार आणि पाच षटकार मारले. विराटचा स्ट्राईक रेट १६७.३५ होता. ग्लेन मॅक्सवेल तीन चेंडूत दोन षटकारांच्या मदतीने नाबाद १२ धावा करून नाबाद राहिला. दिनेश कार्तिक खातेही उघडू शकला नाही.
टिळक वर्माचे अर्धशतक
डावखुरा फलंदाज तिलक वर्माने ४६ चेंडूत नाबाद ८४ धावा करत मुंबई इंडियन्सला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले. एका टोकाकडून मुंबईच्या विकेट्स सतत पडत होत्या आणि तिलक दुसऱ्या टोकाकडून धावा काढत होता. त्याने डावाच्या शेवटच्या चेंडूवर हर्षल पटेलला षटकार ठोकला. त्याच्या या खेळीमुळे मुंबईने २० षटकांत सात गडी गमावून १७१ धावांपर्यंत मजल मारली.
टिळकने आपल्या खेळीत ९ चौकार आणि ४ षटकार मारले. तिलक वर्मा ५.२ षटकात ३ विकेट पडल्यानंतर क्रीजवर आला. त्यावेळी संघाची धावसंख्या २० धावा होती. तेथून त्याने मुंबईला १७० धावांच्या पुढे नेले. तिलकने सूर्यकुमार यादवसोबत चौथ्या विकेटसाठी २८ धावांची भागीदारी केली. यानंतर त्याने निहाल बधेरासोबत पाचव्या विकेटसाठी ३० चेंडूत ५० धावा जोडल्या. त्यानंतर त्याने अर्शद खानसोबत सातव्या विकेटसाठी १८ चेंडूत नाबाद ४८ धावांची भागीदारी केली.