संगमेश्वर /प्रतिनिधी
माध्यमिक शिक्षण विभाग,रत्नागिरी व रत्नागिरी जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हिंदी विषय कार्यशाळा श्रीम.क. पां.मुळ्ये हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय,कोळंबे इथे पार पडली.
कोळंबे येथे घेण्यात आलेल्या या कार्यशाळेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष नयन मुळ्ये यांच्या हस्ते पार पडले.दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेत एकूण सहा सत्रे पार पडली.प्रथम सत्रात सुदेश गोरे सर यांनी ‘उपयोजित लेखन’ या विषयावर माहिती देताना रचना विभागाच्या गुणांचे वर्गीकरण स्पष्ट केले. द्वितीय सत्रात भानुदास गलांडे सरांनी ‘शुद्धलेखन की दृष्टि से व्याकरण के नियम १ से २३’ या विषयावर मार्गदर्शन केले.तिसऱ्या सत्रात सुहास गेल्ये सर यांनी ‘मौखिक अभिव्यक्ती कमजोरियॉं और उपाय’ या विषयावर मार्गदर्शन करताना शब्द उच्चारणातले बारकावे समजावून सांगितले.चौथ्या सत्रात सूरज माने सर यांनी ‘शुद्धलेखन की दृष्टि से व्याकरण के नियम २४ से ४७ तक’ स्पष्ट केले.पाचवे सत्र उमेश तायडे सर यांनी घेतले.त्यांनी ‘ प्राश्निक के संबधित मार्गदर्शक तत्त्व ‘ या विषयावर मार्गदर्शन करताना प्रश्न निर्मिती कौशल्यावर प्रकाश टाकला.सहाव्या सत्रात सचिन पोकळे सरांनी ‘नमूना उत्तरपत्र निर्मिती – मार्गदर्शक तत्त्व ‘ या विषयावर माहिती दिली.हे सर्व तज्ञ मार्गदर्शक सातारा येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय प्रशिक्षणात सहभागी झाले होते.
या प्रशिक्षणाला शुभेच्छा देताना संस्थेचे अध्यक्ष नयन मुळ्ये म्हणाले की,’ हिंदी ही संस्कारी भाषा आहे.या भाषेमध्ये राष्ट्राला एकत्र बांधून ठेवण्याची क्षमता आहे.विदेशी भाषेच्या प्रेमात आपण देशी भाषा व संस्कृती यांकडे दुर्लक्ष करीत आहोत,पण ते खूप धोक्याचे ठरेल.’ राज्याध्यक्ष अनिलकुमार जोशी यांनी हिंदी भाषेचे महत्व समजावून देताना हिंदी भाषा व हिंदी विषय टिकविण्यासाठी काय करावे लागेल यावर मार्गदर्शन केले.ते म्हणाले की, राष्ट्रभक्ती जागृत करण्याचे महान काम हिंदी भाषेच्या माध्यमातून होत असते.विदेशी असून इंग्रजी जर पहिलीपासून शिकवली जात असेल तर हिंदी भाषेवर अन्याय का?पहिलीपासून हिंदी शिकवली जावी यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.या प्रशिक्षणाला जिल्ह्यातील १९२ शिक्षक उपस्थित होते.या प्रशिक्षणानंतर सर्व तालुक्यांची हिंदी मंडळे स्थापन करण्यात आली व नवनिर्वाचित तालुकाध्यक्षांचे मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले.
या कार्यक्रमाला मुख्याध्यापक संजय मुळ्ये व पर्यवेक्षक रवींद्र मुळ्ये उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष प्रशांत खेडेकर यांनी करताना प्रशिक्षणाचे महत्व विषद केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेया रानभरे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा सचिव मिलिंद कडवईकर यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्याध्यक्ष राजेंद्र खांबे,शिवराम जोशी,हेमराज बहिराम व इतर शिक्षक, वसतिगृहाचे कर्मचारी,विद्यार्थी यांनी मेहनत घेतली.