(मुंबई)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंविरोधात केलेल्या बंडाचे लोण कोल्हापूर जिल्ह्यातही उमटले. यामध्ये शिवसेनेला मोठा फटका बसला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन शिवसेना खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. तसेच, तेथील शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार राजेश क्षीरसागरसुद्धा एकनाथ शिंदे गटात गेले आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली होती. त्यातच जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघावर भाजपकडूनही विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे.
हातकणंगले मतदारसंघातील हाजी असलम बादशाह सय्यद यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हातून शिवबंधन बांधून घेत शिवसेनेत प्रवेश केला.#ShivSena pic.twitter.com/7QytOZg8Hr
— Shivsena UBT Communication (@ShivsenaUBTComm) December 6, 2022
आता कोल्हापुरात शिवसेनेची दावेदारी मजबूत करण्यासाठी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने वंचित बहुजन आघाडीचे 2019 मधील कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवार हाजी अस्लम सय्यद यांना त्यांच्या गटात सामील करून घेतले आहे. त्यांचा प्रवेश उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत झाला. वंचित बहुजन आघाडीकडून 2019 च्या लोकसभा निवडणुकीत उभे राहून त्यांनी सव्वा लाखांवर मते मिळवली होती. त्यानंतर हाजी अस्लम चर्चेत आले होते. त्यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेला चांगला फायदा होईल असे मानले जात आहे.