(कोल्हापूर)
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीची झीज झाल्याचे समोर आल्यानंतर राज्य पुरातत्त्व विभागाकडून पाहणी करण्यात आली. यानंतर केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडून पाहणी करण्यात आली. मात्र, विभागाने पाहणी करताना श्री अंबाबाईच्या मूर्तीशी छेडछाड झाल्याचा आरोप श्री पूजकांच्या वकिलांनी केला आहे. लेपचा काही थर काढून टाकल्यानंतर मूर्तीचा चेहरा आणखी खराब झाल्याचे म्हटले आहे.
या संदर्भात देवीच्या मूर्तीची दोन छायाचित्रे कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात सादर करण्यात आली आहेत. श्रीपूजक गजानन मुनीश्वर यांनी मूर्ती संवर्धन प्रक्रियेबाबत कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी श्रीपूजकांच्या वकिलांनी केंद्रीय पुरातत्त्व विभागाने छेडछाड केल्याचा गंभीर आरोप केला. कोणत्याही परवानगीशिवाय चेह-यावर यापूर्वी लावलेला लेपचा काही थर काढून टाकला.
लेपचा काही थर काढून टाकल्यानंतर मूर्तीचा चेहरा आणखी खराब झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अधिका-यांनी बेकायदेशीर कृत्य केल्याचा श्री पूजकांच्या वकिलांनी दावा केला. या अगोदर मूर्तीची पुन्हा काही प्रमाणात झीज झाल्याने राज्य पुरातत्व विभागाने २८ फेब्रुवारी रोजी पाहणी केली होती. त्यानंतर केंद्रीय पुरातत्त्व विभागाला पत्र पाठवण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या अधिका-यांनी मंगळवारी पाहणी केली होती.