कोल्हापूर जिल्ह्यातील सरसकट दुकाने सुरू करण्यास परवानगी द्या, या व्यापाऱ्यांच्या मागणीवर पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरातील व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत काही निकष पाळून कोल्हापुरातील दुकाने सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री ठाकरे सकारात्मक असून, येत्या दोन दिवसात याबाबत अधिकृत आदेश निघण्याची शक्यताही आहे.
रत्नागिरीतही सरसकट दुकाने सुरू करण्यास परवानगी द्या यासाठी गेली काही दिवसापासून व्यापारी आणि प्रशासन यांच्यामध्ये संघर्ष सुरु आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी व्यापारी आणि प्रशासन यांच्यात वादावादीचा प्रकार घडला आहे. राज्य सरकारने घालून दिलेल्या निर्बधानुसारच जिल्ह्यात लॉकडाऊनचे नियम लागू आहेत. मात्र यामुळे व्यापारी वर्ग आर्थिकदृष्ट्या अडचणीत आला असून यामधून दिलासा देण्याची मागणी करण्यात येत आहे. इतर जिल्ह्यांप्रमाणे रत्नागिरीतही अन्य काही पर्याय काढून सर्व प्रकारची दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी देता येईल यासाठी व्यापारी आग्रही आहेत.
याबाबत मुख्यमंत्री महोदयांकडे योग्य तो पर्याय ठेऊन स्थानिक नेते व प्रशासनाने रत्नागिरीतील व्यापाऱ्यांच्या बाजूने ठाम उभे राहणे गरजेचे आहे. तसेच सर्व पक्षीय नेते मंडळीनी एकत्र येऊन प्रशासनाच्या सहकार्याने सध्याच्या स्थितीवर योग्य मार्ग काढणेही आवश्यक आहे. परंतु याबाबत कोणालाही आपल्या जबाबदारीचे भान नसल्याचे व्यापारी वर्गातून बोलले जात आहे. इतके दिवस कडक निर्बध व सरकारचे सर्व निकष पाळूनही कोरोना रुग्ण कमी होत नाहीत हे अपयश प्रशासनाचे, राजकारण्यांचे, व्यापाऱ्यांचे की जनतेचे हा प्रश्न आता सर्वसामान्य लोकांना पडला आहे. व्यापाऱ्यांच्या सहनशक्तीचा आता अंत झाला आहे, जर आणखी काही दिवस असेच चालू राहिले तर प्रशासनाचा विरोध पत्करून दुकाने चालू ठेवण्याचा निर्धार व्यापाऱ्यांनी केला असल्याचे बोलले जात आहे.