(रत्नागिरी)
संगमेश्वर तुळसणीतील तुषार बेर्डे (25, तुळसणी, बेर्डे वाडी) हा कोल्हापुरातील आंबर्डे येथे मित्रांसोबत गेला होता. अंघोळ करत असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो आत 40 फूट खोल धरणात बुडाला. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली. मात्र याबाबतची माहिती देऊनही कोल्हापूरातील प्रशासनाने दुर्लक्ष केले. तुळसणीतील ग्रामस्थ दोन दिवस या ठिकाणी तळ ठोकून होते. मात्र पोलीस आणि तहसीलदार यांनी सहकार्य न केल्यामुळे ग्रामस्थांना दोन दिवस उपाशी राहून मृतदेह शोधून काढण्यासाठी वाट पहावी लागली. शुक्रवारी घडलेल्या घटनेनंतर पोलीस कोणतेच सहकार्य करत नव्हते. शेवटी शनिवारी सकाळी रत्नागिरीतील पत्रकारांनी संपर्क साधल्यानंतर यंत्रणांची धावाधाव सुरू झाली. त्यानंतर पुढील शोधकार्याला सुरुवात झाली.
दरम्यान शुक्रवारी सकाळी बुडालेला तुषार बेर्डे याचा मृतदेह शनिवार 3 जून रोजी दुपारी दोन वाजता काढण्यात आला. ज्या ठीकाणी बुडाला होता तिथेच थोड्या अंतरावर पाण्याच्या तळाशी मातीत रुतलेल्या स्थितीत आढलून आला. भर उन्हात दुपारी बाहेर काढलेला मृतदेहाचा पंचनामा करण्यासाठी पोलीस तब्बल दोन तासांनी घटनास्थळी दाखल झाले. 2 वाजता घटना घडल्यानंतर सायंकाळी 4.30 वाजण्याच्या दरम्यान पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पंचनामा करण्यात आला. मृतदेह शववि्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. सायंकाळ पर्यंत मृतदेह ताब्यात देण्यात आला नव्हता. रात्री मृतदेह ताब्यात मिळाल्यानंतर तुळसनी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सविस्तर वृत्त असे की, तुषार बेर्डे हा तुळसणी येथील तरुण असून तो आपल्या मित्रांसोबत मुंबई हून गावी फिरण्यासाठी आला होता. मार्लेश्वर, रत्नागिरी अशा ठिकाणी फिरल्यानंतर त्यांनी कोल्हापूर शाहूवाडी येथील आंबर्डे या ठिकाणी शुक्रवारी सकाळी 9.30 वाजता धरणात पोहण्यासाठी उतरले. मात्र धरणातील पाण्याचा अंदाज न आल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला. मित्रांनी अरडाओरडा केला मात्र काहीच उपयोग झाला नाही. तो पर्यंत तो दिसेनासा झाला होता. याची माहिती तुळसणी येथे समजताच येथील ग्रामस्थ कोल्हापुरात घटनास्थळी दाखल झाले. यंत्रणेशी संपर्क साधला. मात्र त्यांना कोल्हापूर प्रशासनाकडून सहकार्य केले जात नव्हते. शेवटी नातेवाईकांनी रत्नागिरीतील एका पत्रकाराला फोन केला. पत्रकारांनी कोल्हापुरात संपर्क साधल्यानंतर यंत्रणा कामाला लागली.
एवढ्या मोठ्या शहरात बुडालेला मृतदेह शोधण्यासाठी कोल्हापूर प्रशासनाला दोन दिवस प्रतीक्षा करावी लागली हे मोठ दुर्दैव आहे. एका बाजूला पावसाळ्यातील आपत्कालीन स्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन तयार आहे अशी बतावणी करणारे प्रशासन इथे मात्र फोल ठरले आहे.