(रायगड)
रायगड जिल्ह्यातील कोलाड मधील तिसे रेल्वे फाटकावर गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या गोळीबारात चंद्रकात कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला. कोकण रेल्वे मार्गावरील कोलाडनजीक तिसे रेल्वे फाटकाजवळ ही घटना घडली आहे. या घटनेत वॉचमनला गोळी मारुन मारेकरी फरार झाला. यामध्ये वॉचमनचा मृत्यू झाला असून चंद्रकांत कांबळे असे मृत वॉचमनचे नाव आहे. घटनेसंदर्भातील माहिती मिळताच पोलिस दाखल घटनास्थळी दाखल होते. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
चंद्रकांत कांबळे रेल्वे फाटकावर सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. दुपारच्या सुमारास ते कामावर असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार केला. कपाळात गोळी लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. या अनपेक्षित घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, कोणत्या कारणामुळे हा हल्ला झाला याची माहिती समोर आलेली नाही. हल्लेखोराचा शोध सुरू असल्याचे कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित साबळे यांनी सांगितले.
भर दिवसा हत्या झाल्याने ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले आहेत. जोपर्यंत मारेकऱ्याला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली होती. यामुळे येथे तणावाचे वातावरण होते. मृत चंद्रकांत कांबळे हे आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते होते तसेच ते कोकण रेल्वे संघटनेवर पदाधिकारी होते. रेल्वे संघटनेच्या अंतर्गत वादातून गोळीबार झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मृत कांबळे पाले बुद्रुक येथील रहिवाशी होते. दुपारच्या सुमारास ते जेवण करत असताना अज्ञाताने समोरून अगदी जवळून त्यांच्यावर गोळीबार केला. हल्लेखोराने झाडलेली गोळी थेट कपाळात घुसल्याने चंद्रकांत कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला.