कोरोनावरील लस घेतल्यानंतर 97.38 टक्के लोक कोरोनाच्या संसर्गापासून सुरक्षित राहिले आहेत, तसेच लसीकरणानंतरही कोरोनाबाधित झालेल्यांपैकी केवळ 0.06 टक्के लोकांनाच रुग्णालयात दाखल होण्याची गरज भासली आहे. एकूणच, लसीमुळे संरक्षण मिळण्याचे प्रमाण फार जास्त असून, प्रकृती बिघडण्याची शक्यता अतिशय कमी आहे. एका ताज्या अभ्यासातून ही दिलासादायक बाब समोर आली आहे.
दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयाने शनिवारी सायंकाळी हा अभ्यासात्मक अहवाल जाहीर केला आहे. आज रविवारी एका इंग्रजी दैनिकाने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले आहे. लसीकरण झाल्यानंतरही कोरोनाबाधित झालेल्या लोकांचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या अभ्यासातून असे समोर आले की, कोरोनाची लस घेतलेल्या लोकांना संसर्ग होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे; तसेच लस घेतल्यानंतरही ज्यांना कोरोनाची लागण झाली, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात दाखल होण्याची वेळ आलेली नाही. त्यांची प्रकृती धोकादायक होण्याचे किंवा मृत्यू होण्याचे प्रमाणही शून्य आहे. अपोलो रुग्णालयाने कोव्हिशिल्ड लस घेतल्यानंतर पहिल्या शंभर दिवसांत कोरोनाची लक्षणे जाणवली, त्यांच्यावर हा अभ्यास केला आहे.