कोरोना महामारीतही रा. प. कर्मचारी अहोरात्र काम करीत आहेत. आतापर्यंत 7708 कर्मचारी कोरोना बाधित झाले आहेत. 205 कर्मचारी मृत पावले आहेत; मात्र सर्वच मृत कामगारांच्या वारसांना 50 लाख रुपयांचे विमा कवच मिळालेले नाही व अनुकंपा तत्त्वावर नोकरी नाही. बाधित कर्मचार्यांना वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती मिळाली नाही. याबाबत महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार केला आहे. या आजारात दीड लाख रुपये अग्रिम रक्कम मिळण्याबाबतचे निवेदन राज्य अध्यक्ष संदीप शिंदे यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांना पाठवले आहे.
रा. प. महामंडळामध्ये सध्या काही आकस्मिक गंभीर आजारांमध्ये दीड लाख रुपयांपर्यंत अग्रिम देण्याची तरतूद आहे. कोविड या आजार गंभीर व आकस्मिक स्वरूपाचा आहे. कर्मचारी कामगिरीवर असताना त्याला तो झालेला असतो. त्याचा प्रसार कर्मचार्यांच्या कुटुंबातही झालेला असल्याने या तातडीच्या प्रकरणी वैद्यकीय उपचारासाठी गरज भासल्यास दीड लाख रुपये देणे आवश्यक आहे, अशी मागणी संघटनेने केली आहे.