एकीकडे कोरोना बाधितांची सं‘या झपाट्याने वाढत असताना व आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडला असताना केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारने कोरोना बाधितांवर उपचारासाठी झायडस कॅडिला या कंपनीच्या ‘विराफिन’ या विषाणूरोधी औषधाला मंजुरी दिली आहे. आमचे हे औषध 91 टक्के प्रभावी असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
झायडस कॅडिलाचे इंटरफेरॉन अल्फा-2 बी म्हणजे विराफिन अँटिव्हायरल औषध पेगिफन म्हणूनही ओळखले जाते. कोरोना बाधितांवर उपचारासाठी याला आपत्कालीन मंजुरी द्यावी, अशी मागणी कंपनीने भारतीय औषध महानियंत्रकांकडे (डीसीजीआय) केली होती. डीसीजीआयने या औषधाला मंजुरी दिली आहे. आता या औषधाचा कोरोना बाधितांवर उपचारासाठी वापर केला जाणार आहे.
झायडस कॅडिला ही अहमदाबादमधील औषध कंपनी असून, हिपेटायटिस-सी साठी त्यांनी हे औषध तयार केले होते. 10 वर्षांपूर्वी यकृतासंबंधी आजारांवर उपचार करण्यासाठी या औषधाला परवानगी देण्यात आली होती. आता हे औषध कोरोना बाधितांवर उपचारासाठी वापरण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी कंपनीने केली होती.
या औषधामुळे कोरोना बाधित लवकरात लवकर बरा होतो, असा दावा कंपनीने केला आहे. तसेच आपल्या या औषधाच्या यशस्वीतेचे प्रमाण 91 टक्के आहे, असाही कंपनीचा दावा आहे. या औषधाची कोरोनाबाधितांवर चाचणी घेण्यात आली. या चाचणीत ज्या रुग्णांना औषध देण्यात आले त्यापैकी 91.15 टक्के बाधितांची आरटी-पीसीआर चाचणी 7 दिवसांतच नकारात्मक आली, असे कंपनीने सांगतिले आहे. आपल्या या नवीन औषधामुळे आजारामुळे निर्माण होणारी गुंतागुंतही कमी होते. तसेच बाधितला प्राणवायूवर ठेवण्याचा कालावधीही कमी होतो, असे कंपनीने सांगितले.