( पुणे )
वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा. आता पंढरपूरच्या सर्व वारक-यांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदाची वारी ही कोरोना निर्बंधमुक्त असल्याची घोषणा सोलापूरचे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांनी केली आहे. कोरोनाचा संसर्ग आता जवळपास नाहीसा झाला आहे, शासनानानेही बहुतेक सर्व निर्बन्ध उठवले आहेत. आता वारी निर्बंधमुक्त झाल्याचे जाहीर केल्याने वारक-यांना यंदा आपल्या सर्व परंपरा पाळत पायी दिंडी करत आपल्या पांडुरंगाचे दर्शन घेता येणार आहे.
प्रत्येकवर्षी न विसरता, न चुकता आपल्या लाडक्या पांडुरंगाचे दर्शन घेणे, त्याला डोळे भरून पाहाणे ही सच्च्या वारकऱ्याची ओळख ! खांद्यावर भगवी पताका घेउन उन्हातान्हात, पाऊस पाण्यात कशाकशाची तमा न बाळगता विठुरायाचे ओठावर अखंड नामस्मरण करत वारकरी पंढरीच्या वाटेवर निघतात… शेकडो कोस पायी वारी करून फक्त विठोबाचे डोळे भरून दर्शन घेणे हे या वारीचं साध्य आता विनासायास पार पडणार आहे.
विठू नामाचा गजर करीत लाखो वारकरी आषाढी वारीला पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाला पायी जात असतात. पण गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा फटका पिढ्यान्-पिढ्या सुरू असलेल्या या वारीला सुद्धा बसला होता. वारीवर या काळात अनेक निर्बंध घालण्यात आले होते.
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत आता अगदीच नगण्य झाली आहे. त्यामुळे यंदाच्या वारीवर कुठलेही निर्बंध असणार नाहीत. दरवर्षी 12 लाख वारकरी हे पायी वारी करत विठुरायाच्या दर्शनासाठी जात असतात. पण यावर्षी किमान 15 लाख वारकरी पायी जाण्याची शक्यता असल्याचे सोलापूरचे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांनी म्हटले आहे.
देशासह राज्याच्या कानाकोप-यातून येणा-या सर्व वारक-यांचे जिल्ह्यातील जनतेने स्वागत करायला हवे. हा केवळ जिल्ह्यासाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रसाठी आनंद सोहळा आहे. तो परंपरेनुसार झाला पाहिजे असेही भरणे यावेळी म्हणाले.