कोरोना नियंत्रणात न आल्यानं आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय नेतृत्वावर कडाडून टीका होताना दिसत आहे. भारत मोठा लस उत्पादक देश असताना देखील लसीकरणावर ज्याप्रमाणात भर द्यायला पाहिजे होता, तेवढा भर दिला गेला नाही, असा आरोप करण्यात येत आहे. त्यातच आता अमेरिकन सरकारचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डाॅ. अँथनी फाउची यांनी भारताला एक महत्वाचा सल्ला दिला आहे.
कोरोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. भारताला कोरोनाच्या या संकटातून बाहेर पडण्यासाठी लसीकरण हा एकच पर्याय असल्याचं अमेरिकेचे संसर्ग रोग तज्ज्ञ डाॅ. अँथनी फाउची यांनी म्हटलं आहे. डॉ.अँथनी हे अमेरिकन सरकारचे मुख्य वैद्यकीय सल्लागार देखील आहेत. भारतातील रुग्णालयात ऑक्सिजन, पीपीई किटस आणि अन्य वैद्यकीय सामग्री, उपकरणांचा तुटवडा असून अमेरिकेनं मदतीसाठी पुढे यायला हवं, असंही अँथनी फाउची यांनी म्हटलं आहे.
रुग्णालयात खाटा उपलब्ध नसल्यामुळं रुग्णांना वाऱ्यावर सोडू शकत नाही. भारतात ऑक्सिजन मिळणंही कठीण झालं आहे. कोरोना विषाणूचा प्रसार थांबवण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊनची आवश्यकता असल्याचं डाॅ. अँथनी फाउची यांनी म्हटलं आहे. भारत जगातील सर्वात मोठा लस उत्पादक देश आहे. त्यांना फक्त देशातूनच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील संसाधनं उपलब्ध होत आहेत, असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, कोरोनाचा कहर शमण्यासाठी सात वर्षे लागू शकतात, असा दावा डॉ. अँथनी फाउची यांनी केला होता. तसेच जगभरातील 75 टक्के नागरिकांची हर्ड इम्यूनिटी समान पातळीवर येण्यासाठी बराच मोठा कालावधी जाईल, असं अँथनी फाउची यांनी म्हटलं होतं.