मुंबई : कोरोनाच्या काळात ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा मृत्यू झाला आहे अशा अकृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी एका वृत्तवाहिनीला ही माहिती दिली आहे. या निर्णयामुळे पालक गमवलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये घरातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे. कोरोनामुळे अनेक विद्यार्थ्यांनी आई, वडिल गमावले आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अकृषी विद्यापीठांची फी कमी करण्याचा तत्वत: निर्णय झाला आहे. त्यामुळे उद्यापर्यंत यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठाच्या कुलगुरुंसोबत शुल्काबाबत दुपारी चार वाजता बैठक झाली. सुमारे एक तास ही बैठक पार पडली.
ट्युशन फी वगळता इतर विद्यापीठ शुल्क जसे की ग्रंथालय, कॉम्पुटर लॅब, जिमखाना हे बंद असताना या गोष्टींची फी कमी करता येईल का? याबाबत चर्चा विद्यापीठ कुलगुरूसोबत या बैठकीत करण्यात आली. कुलगुरूंसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.