कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव संपूर्ण जगात पाहायला मिळत आहे. त्यातच अशातच कोरोनाचे वेगवेगळे स्ट्रेन समोर येत आहेत. कोरोनाचा नवा स्ट्रेन पहिल्यापेक्षा अधिक घातक असल्याची माहिती मिळत आहे. हा स्ट्रेन शरीराच्या अनेक भागांवर विपरित परिणाम होत असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाचा प्रभाव सर्वप्रथम फुफ्फुसावर आणि श्वसनाशी निगडीत व्याधी असलेल्यांवर होतो. त्यानंतर हा विषाणू शरीराच्या इतर अवयवांवरही प्रभाव टाकत असल्याचे अनेक संशोधनांमधून समोर आले आहे. कोरोना विषाणूमुळे आता मज्जासंस्थेशी निगडीत आणि मानसिक आजारही होत आहेत. याव्यतिरिक्त कोरोनामुक्त झाल्यानंतर चिंता आणि सातत्याने भावना बदलणे यासारख्या समस्यांचाही सामना करावा लागत आहे.
उद्भवू शकतात हे आजार
एन्सेफॅलोपॅथी किंवा मेंदूचे आजार : कोरोनामुक्त झाल्यानंतर लोकांमध्ये मेंदूचे आजार उद्भवल्याचे दिसून येत आहे. यामध्ये मनोविकृती आणि स्मरणशक्ती कमकुवत होण्याची शक्यता असते.
इन्सेफेलायटिस : संसर्गमुक्त झाल्यानंतर इन्सेफेलायटिसची समस्या उद्भवू शकते. कोरोनामुक्त झालेल्यांच्या मेंदूला सूज येते.
रक्ताच्या गुठळ्या : कोरोनानंतर आणखी एक गंभीर समस्या निर्माण होत आहे. कोरोनामुक्त झालेल्यांच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात. यामुळे मस्तिष्काघाताचा धोका उद्भवतो. अनेक कोरोनाबाधितांमध्ये ही समस्या आढळली आहे.
गुलियम बेरी सिंड्रोम : यामध्ये शरीराची रोग प्रतिकारशक्ती नसांवर हल्ला करते. यामुळे अशक्तपणा, सुन्न पडणे आणि अर्धांगवायूचा धोका वाढतो.
अँग्झायटी : अनेकांना कोरोनामुक्त झाल्यानंतर मानसिक समस्या उद्भवू लागतात. यामध्ये भावना बदलणे आणि अँग्झायटीच्या समस्यांचा समावेश आहे.
संशोधनातील टक्केवारी
कोरोनामुक्त झाल्यानंतर 6 महिन्यांनी 33 टक्के बाधितांंमध्ये मानसिक आणि मज्जाव्यवस्थेशी निगडीत समस्या दिसून आल्या आहेत. कोरोनाबाधितांमध्ये श्वासासंबंधित इतर संसर्ग असणार्या रुग्णांच्या तुलनेत मानसिक आणि न्युरोलॉजिकल समस्या होण्याची शक्यता 16 टक्क्यांनी अधिक आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतर 2 टक्के लोकांना स्ट्रोक, 0.7 टक्के लोकांना डिमेन्शिया, 14 टक्के लोकांना मूड स्विंग्स, 5 टक्के लोकांना अनिद्रा, 0.6 टक्के ब्रेन हॅमरेज, 2.1 टक्के इस्केमिक स्ट्रोक, 17 टक्के अँग्झायटी डिसऑर्डरचा सामना करत आहेत. त्यासोबतच 24 टक्के लोक चिंता आणि मानसिक आजारांनी ग्रस्त आहेत.